संघ समतोल हेच आव्हान

कोलकाता: बांगलादेशविरुद्धच्या इंदोर कसोटीत विजय मिळविलेला भारतीय संघ गुलाबी चेंडूवर पहिली दिवस-रात्र कसोटीतही संभाव्य विजेता मानला जात असला तरी या सामन्यात हा चेंडू वेगवान गोलंदाजाना की फिरकी गोलंदाजांना मदत करेल तसेच, संघाचा समतोल कायम राहील यासाठी अंतिम अकरा खेळाडूंमध्ये कोणाची निवड करायची या संभ्रमात कर्णधार कोहली तसेच संघव्यवस्थापन सापडले आहेत.

संघात जास्तीचा वेगवान गोलंदाज खेळवायचा की एक जादा फलंदाज घेत फलंदाजी भक्कम करायची अशी कोंडी निवड समितीचीही झाली आहे. शुक्रवारपासून हा दिवस-रात्र कसोटी सामना सुरू होत आहे. संघात नक्की कोणते बदल करायचे यावरून बरेच प्रश्‍न निर्माण झाले आहेत. रवीचंद्रन अश्विन व रवींद्र जडेजा हे दोन फिरकी गोलंदाज संघात आहेत. इंदोर कसोटीत या दोघांनीही चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे यापैकी एकालाच संधी द्यावी का नाही असे चित्र तयार झाले आहे. महंमद शमी, उमेश यादव आणि ईशांत शर्मा असे तीन वेगवान गोलंदाज खेळवायचे का हनुमा विहारीची निवड करत एक जास्तीचा फलंदाज घ्यायचा हा प्रमुख प्रश्‍न निवड समितीला पडला आहे.

मयांकचे सनीकडून कौतुक
बांगलादेशविरुद्ध द्विशतकी खेळी करणाऱ्या मयांक अग्रवालचे लिटील मास्टर सुनील गावसकर यांनी कौतुक केले आहे. मयांकसमोर कामगिरीत सातत्य राखण्याचे आव्हान आहे. मयांक आपल्या खेळाचा आनंद लुटत आहे. मयांक सातत्यपूर्ण फलंदाजी करत आहे, हेच सातत्य त्याला कायम राखायचे आहे, असेही गावसकर यांनी नमूद केले.

कसोटी क्रमवारीत भारताचे वर्चस्व
बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील मोठ्या विजयामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने जाहीर केलेल्या कसोटी क्रमवारीत भारतीय खेळाडूंनी वर्चस्व निर्माण केले आहे. या क्रमवारीत चक्‍क पाच भारतीयांनी स्थान मिळविले आहे. फलंदाजांच्या यादीत 11 खेळाडूंमध्ये भारताचे 5 खेळाडू आहेत. कर्णधार विराट कोहली दुसऱ्या, चेतेश्वर पुजारा चौथ्या, अजिंक्‍य रहाणे पाचव्या, रोहित शर्मा 10 व्या आणि मयांक अग्रवाल 11 व्या क्रमांकावर आहे. या यादीत ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ पहिल्या क्रमांकावर आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.