अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांसाठी 2 हजार कोटी रूपये वितरीत

मुंबई : “क्‍यार’ व “महा’ चक्रिवादळामुळे आलेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी मंगळवारी 2 कोटी 5लाख 93 हजार 665 कोटी रूपयांचा पहिला हप्ता वितरीत करण्यात आला आहे.

राज्यातील राष्ट्रपती राजवटीमुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते. अखेर राज्यपालाच्या निर्देशानुसार ही रक्कम जारी करण्यात आली आहे.

अवकाळी पावसामुळे राज्यातील 34 जिल्ह्यांतील 325 तालुक्‍यांतील 94 लाख हेक्‍टर जमिनीवरील शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. राज्यपालांनी शेतकऱ्यांना शेतपीकांसाठी हेक्‍टरी 8 हजार तर बागायती शेतीसाठी 18 हजार रुपये प्रति हेक्‍टर इतकी मदत जाहीर केली.

या मदतीचा पहिला टप्पा म्हणून दोन हजार एकोणसाठ कोटींची मदत कोकण, नाशिक, संभाजीनगर, अमरावती, नागपूर, पुणे विभागातील शेतकऱ्यांना तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश आज शासन निर्णयाद्वारे देण्यात आले आहेत.

मदत वाटप झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ही रक्कम बॅंकेत पडून राहणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी, त्याच प्रमाणे अशी बाब आढळून आल्यास संबंधितावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे.

ही रक्कम बॅंकांकडे वितरीत करण्याचे आदेश देण्यात आले असून जर लाभार्थ्यांचे नाव, खातेक्रमांक जुळत नसेल अशा तांत्रिक कारणास्तव परत आलेला निधी निलंबन खात्यात न ठेवता थेट शासनाला परत करण्यात यावा असेही निर्देश बॅंकांना करण्यात आले आहेत.

कर्जवसुली करू नका!
शेती, फळपिकांच्या नुकसानीकरीता 33 टक्के अथवा त्याहून अधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यात येणार आहे. ही मदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या बॅंक बचत खात्यात थेट जमा करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर थेट जमा झालेल्या रक्कमेतून बॅंकांनी कोणत्याही प्रकारची वसुली करु नये, असे आदेश संबंधित बॅंकांना देण्यात आले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.