नवी दिल्ली – इस्रायल (Israel ) आणि हमासमधील (hamas) युद्धविरामाला आणखीन दोन दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. आता आणखीन ओलिसांची आणि कैद्यांची आदलाबदली होणार आहे. सोमवारी रात्री हमासच्या ताब्यातून सुटका झालेल्या ११ इस्रायली महिला आणि मुले इस्रायलमध्ये परत आले. तर इस्रायलच्या तुरुंगांमधून ३३ पॅलेस्टिनींची सुटका केली गेली. (War update) हे सर्व जण मंगळवारी पहाटेच्या सुमारास वेस्ट बँकमधील रामल्ला येथे पोचले. युद्धविरामाला दोन दिवसांची मुदतवाढ मिळाल्याची घोषणा कतारच्यावतीने केली गेली. या मुदतवाढीमुळे गाझामध्ये आणखीन मदत पुरवली जाऊ शकेल, असेही कतारने म्हटले आहे. (ceasefire)
हमासकडून सुटका होणार् या प्रत्येक १० इस्रायलींमागे युद्धविरामाला एक दिवसाची मुदतवाढ दिली जाईल, असे इस्रायलने म्हटले आहे. या अटीला अमेरिका आणि इजिप्तनेही दुजोरा दिला आहे. युद्धविरामाला दोन दिवस मुदतवाढ देण्याच्या निर्णयाचे अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे प्रवक्ते जॉन क्र्बे यांनी स्वागत केले.हमासच्या ताब्यातील नागरिक इस्रायलमध्ये परतल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी जल्लोष केला. तर इस्रायलने तुरुंगातून सोडलेल्या पॅलेस्टिनींचे स्वागत देखील वेस्ट बँकमध्ये करण्यात आले.
सुटका झालेल्या पॅलेस्टिनींमध्ये प्रामुख्याने किशोरवयीन मुलांची संख्या जास्त आहे. त्यांच्यावर इस्रायली सुरक्षा रक्षकांवर दगडफेक करणे आणि पेट्रोल बॉम्ब फेकण्यासारखे गुन्हे दाखल होते. मात्र हे गुन्हे तुलनेने सौम्य स्वरूपाचे आहेत. हत्येच्या गुन्ह्यात दोषी ठरवलेल्यांना आणि दहशतवाद्यांना तुरुंगातून सोडले जाणार नाही, असे इस्रायलने पूर्वीच स्पष्ट केले आहे. इस्रायल आणि हमासच्या युद्धात आतापर्यंत १३ गजार पॅलेस्टिनी मारले गेले आहेत. तर हमासच्या हल्ल्यात इस्रायलमधील १,२०० जण मारले गेले होते. (Hamas Israel)
आणखीन अडीच आठवडे युद्धविराम शक्य…
युद्धविरामादरम्यान आतापर्यंत इस्रायलच्या एकूण ५० जणांची सुटका झाली आहे. यात अन्य देशांच्या १९ नागरिकांचाही समावेश आहे. याच थायलंड आणि फ्रान्सच्या मजूरांचाही समावेश आहे. तर पॅलेस्टाईनच्या ११७ जणांची इस्रायलच्या तुरुंगांमधून सुटका केली गाली आहे. हमासच्या ताब्यात आणखीन १७५ इस्रायलींना ओलीस म्हणून ठेवण्यात आले आहे. त्यांच्या सुटकेसाठी युद्धविरामाची मुदत आणखीन अडीच आठवड्यांपर्यंत वाढवली जाऊ शकते.