नवी दिल्ली – केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन, त्यांची कन्या आणि विरोधी पक्षाच्या एका नेत्याला दक्षता न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. या तिघांच्या विरोधात भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली खटला चालवण्यात यावा अशी मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली होती, ती दक्षता न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
मागणी करणाऱ्या याचिकेत जे तथ्य मांडण्यात आले होते ते खटला चालवण्यासाठी पुरेसे नसल्याचे नमूद करत विशेष न्यायालयाने याचिका फेटाळून लावली आहे. प्राप्तीकर अहवालाच्या आधारावर गिरीश बाबू नामक व्यक्तीने या तिघांच्या विरोधात न्यायालयाचे दार ठोठावले होते. कोचिन मिनरल अँड रूटाइल लि. या कंपनीकडून एक्सॉलॉजिक सोल्यूशन्स प्रा. लि. कंपनीच्या खात्यात 1.72 कोटी रूपये जमा करण्यात आले होते.
ही कंपनी मुख्यमंत्री विजयन यांची मुलगी वीणा यांची आहे आणि त्याच कंपनीचे संचालन करतात. केवळ मुख्यमंत्री आणि त्यांची कन्याच नाही तर राज्यातील अनेक बडे अधिकारी, विरोधी पक्ष कॉंग्रेसचे नेते रमेश चेन्नीथलाही या घोटाळ्यात सहभागी असल्याचे याचिकाकर्त्याचे म्हणणे होते. खाण आणि अन्य दुसऱ्या उद्योगांत या सगळ्या नेत्यांनी अधिकाऱ्यांनी मोठी गुंतवणूक केल्याचा आरोप आहे.
आयकर विभागाने यासंदर्भात जे छापे घातले त्यात अनेक महत्वाचे दस्तावेज जप्त करण्यात आले आहेत. त्यात देवाणघेवाणीचे जे व्यवहार झाले आहेत त्याचे ठोस पुरावे असल्याचाही याचिकाकर्त्याचा दावा आहे व भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली या सगळ्यांच्या विरोधात खटला चालवण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते यांच्यावर एकाच प्रकरणात भ्रष्टाचाराचा खटला चालवण्याची मागणी केली जाण्याची ही बहुदा देशातील पहिलीच घटना असावी.