पुणे – घरातील कर्ता व्यक्ती जेव्हा बाधित होतो, तेव्हा त्याला कुटुंबीयांची चिंता सतावते. मात्र, यातूनच करोनाचा प्रसार अधिक होत असल्याचे भीषण वास्तव जिल्ह्याच्या ग्रामीण भागात दिसत आहे. त्यावर निर्बंध कसे आणावेत, ही प्रशासनापुढची मोठी चिंता आहे. त्यामुळे “नागरिकांनो बाधित असाल तर थेट गाव न गाठता, आहे त्याच ठिकाणी थांबून उपचार घ्या. तुमची एक चूक कुटुंबाला आणि पर्यायाने गावाला भोगावी लागू शकते, अशी परिस्थिती आहे.
हवेली, मुळशी, मावळ, पुरंदर, खेड, जुन्नरसह अन्य तालुक्यांत करोना बाधितांच्या एकूण संख्येने दीड हजारांचा टप्पा पार केला. यामध्ये बहुतांश व्यक्ती हे मुंबई, पुण्यासह अन्य शहरांतून आलेले आहेत. तसेच कामानिमित्त किंवा नातेवाईकांना भेटण्यासाठी आलेल्या व्यक्तींचा बाधितांशी संपर्क आल्यामुळे ग्रामीण भागात संसर्ग फोफावला आहे. बाधित व्यक्ती आढळल्यानंतर त्याला लागण कशी झाली, त्यानंतर तो कोणाच्या संपर्कात आला याचा इतिहास आरोग्य विभागाकडून गोळा केला आहे. त्यातून समोर आलेली काही उदाहरणे.
1. कामानिमित्त शहराच्या दुसऱ्या टोकाला गेलेल्या कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे “मी हॉस्पीटलमध्ये दाखल झाल्यावर माझ्या कुटुंबाकडे कोण पाहणार?’ असा विचार करून या व्यक्तीने पत्नी आणि मुलाबाळांना गावाला सोडले. मात्र, काही दिवसांनी कुटुंबातील व्यक्तींना त्रास सुरू झाल्यावर तपासणी केली असता, घरातील सर्वच व्यक्ती करोना पॉझिटिव्ह आल्या. एवढेच नव्हे, तर त्यादरम्यान त्यांच्या घरी आलेल्या काही नातेवाईकांना बाधा झाली आहे.
2. प्रतिबंधित क्षेत्रातील एका व्यक्तीला त्रास जाणवू लागला. त्यामुळे करोना तपासणी केली असता, अहवाल पॉझिटिव्ह आला. मात्र, लक्षणे सौम्य होती. त्यामुळे त्या बहाद्दराने “इथे राहण्यापेक्षा आपल्या गावाला जाऊन राहू’, असा निर्णय घेतला. मात्र, काही दिवसांत त्याच्या घरातील व्यक्तींसह जवळच्या काही नातेवाईकांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
3. करोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला, परंतू लक्षणे दिसत नव्हती. डॉक्टरांकडे गेल्यावर “आपल्याकडे राहण्याची स्वतंत्र व्यवस्था आहे. मी घरीच राहून उपचार घेतो. घराबाहेर अजिबात पडणार नाही,’ असे म्हणून हा बाधित घरी आला. मात्र, “ग्रामीण भागात कोण पाहतंय,’ असे म्हणून हा व्यक्ती फिरायचा. त्यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्या दोघे जण करोना पॉझिटिव्ह आला आहे.
4. शहरातील वस्ती भागात राहत असलेले व्यक्ती नातेवाईक आजारी असल्यामुळे भेटण्यासाठी गेले. काय झाले विचारले असता “वय झाले आणि त्यांना शुगरचा त्रास आहे.’ करोनाची तपासणी केली का? केली आज रिपोर्ट येणार आहे आणि रात्री अहवाल पॉझिटिव्ह आला. तोपर्यंत जेवढी लोक भेटायला आली, त्यांनी करोना घरी नेला. त्यामध्ये काहींचा अहवाल पॉझिटिव्ह आला आणि गाव बंद झाले.