जुन्नर -जुन्नर तालुक्यातील करोनाबाधितांचा आकडा वाढत असून शुक्रवारी (दि. 10) सायंकाळी तो 121 झाला आहे. त्यामुळे तालुक्यातील क्टिव्ह रुग्णांची संख्या 49 झाली असून, करोनावर 69 जणांनी यशस्वीरीत्या मात केली आहे. तर तिघांचा मृत्यू झाला आहे.
लेण्याद्री येथील कोविड केअर सेंटरमध्ये शुक्रवारी (दि. 10) 62 संशयित रुग्णांचे नमुने घेण्यात आले आहेत. चौघेजण बरे होऊन घरी परतले आहेत. जुन्नर तालुक्यासाठी महत्वाची भूमिका पार पाडणाऱ्या या केंद्रामध्ये आजअखेर 1101 संशयितांचे स्वॅब घेतल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. सध्या तालुक्यात 3703 व्यक्ती क्वारंटाइन आहेत.
दरम्यान जुन्नर शहरात दोन दिवसांत दोन रुग्ण मिळाल्यामुळे चिंतेचे वातावरण आहे. त्यातच एक संशयित रुग्ण लेण्याद्री येथून पुण्याला न जाता थेट त्याच्या गावी गेल्यामुळे आरोग्य विभागाची धावपळ उडाली होती. शेवटी त्या रुग्णाला शोधून त्याचे सॅम्पल घेतल्यामुळे प्रशासनाचा जीव भांड्यात पडला आहे.
रेशन दुकानात काम करणाऱ्या युवकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांच्या संपर्कातील नागरिकांचा शोध घेण्याचे मोठे आवाहन आरोग्य विभागासमोर आहे. शुक्रवारी दुपारी जुन्नर शहराच्या मध्यवस्तीत एकबाधित आढळल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.