नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमार्फत मध्य प्रदेशातील रीवामध्ये स्थापन करण्यात आलेल्या 750 मेगावॅटचा सौरऊर्जा प्रकल्प देशाला समर्पित केला. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यासह इतर मंत्रीही या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. हा प्रकल्प आशियातील सर्वात मोठा सौरऊर्जा प्रकल्प असून त्याची क्षमता 750 मेगावॅट आहे.
मध्य प्रदेशातील रीवा येथील सौरऊर्जा प्रकल्पाच्या उद्घाटनावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले. मोदी म्हणाले, आज रीवाने इतिहास रचला आहे. जेव्हा आम्ही आकाशातून टिपलेल्या या प्लांटचा व्हिडीओ पाहतो, त्यावेळी असं वाटतं की, हजारो सोलर पॅनल शेतातल्या पिकांप्रमाणे डोलत आहेत. रीवाचा सौरऊर्जा प्रकल्प या संपूर्ण क्षेत्राला ऊर्जेचं केंद्र बनणार आहे. यामुळे मध्य प्रदेशातील जनतेला लाभ मिळणार असून दिल्लीतील मेट्रोलाही वीज मिळणार आहे.
मोदी म्हणाले, आता रीवामधील नागरिक गर्वाने सांगतील की, दिल्लीतील मेट्रो आमचा रीवा चालवत आहे. रीवाची ओळख आई नर्मदेमुळे आणि पांढऱ्या वाघांमुळे आहे. आता रीवाचं नाव आशिया खंडातील सर्वांत मोठ्या सौरऊर्जा प्रकल्पाशी जोडले जाणार आहे. रीवाचा हा सोलर प्लांट या संपूर्ण क्षेत्राला या दशकातील सर्वांत मोठं ऊर्जेचं केंद्र बनवण्यासाठी मदत करणार आहे. या प्रकल्पामुळे मध्य प्रदेशमधील उद्योगधद्यांसोबतच दिल्लीतील मेट्रोलाही फायदा होणार आहे.
हा प्रकल्प रीवा जिल्ह्यातील मुख्यालयातून 25 किलोमीटर दूर गुढमध्ये 1590 एकरमध्ये विस्तारीत आहे. हा प्रकल्प रीवा अल्ट्रा मेगा सोलर लिमिटेड, एमपी ऊर्जा विकास लिमिटेड आणि भारताचे सौरऊर्जा निगम यांचा एक संयुक्त उपक्रम आहे.