शेवगाव – तालुका पातळीवरील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या कल्याणाच्या योजनांचा लाभ संबंधितांना मिळेल, त्यांची अडवणूक होणार नाही अशा पद्धतीने काम करावे, कामात कसूर करणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यावर प्रसंगी प्रशासकीय कारवाईचा बडगा उगारण्यात येईल, असे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी स्पष्ट केले. शेवगाव तहसील कार्यालयात पार पडलेल्या शासकीय अधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांच्या संयुक्त बैठकीत ते बोलत होते.
यावेळी उपविभागीय अधिकारी देवदत्त केकाण यांनी शेवगाव पाथर्डी तालुक्यातील विविध प्रशासकीय कामांचा आढावा सादर केला. तहसीलदार डॉ. विनोद भामरे, तालुका कृषी अधिकारी किरण मोरे, सा.बां.विभागाचे उपअभियंता अंकुश पालवे, वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता एस.एम.लोहारे, प्रभारी गटविकास अधिकारी सुधाकर मुंढे, सहकारी बॅंकेचे विकास अधिकारी भाऊसाहेब चेके, नायब तहसीलदार मयूर बेरड, भाजप तालुकाध्यक्ष बापूसाहेब पाटेकर, नगरसेवक अरुण मुंढे, सागर फडके,भीमराज सागडे, नितीन फुंदे यांच्यासह विविध पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी उपस्थिती होते.
खासदार डॉ. विखे यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध विकासयोजनांची प्रत्येक तालुक्यात योग्य पद्धतीने अंबलबजावणी व्हावी, त्याचा सर्वसामान्य नागरिकांना लाभ व्हावा, यासाठी खासदार आपल्या गावी या उपक्रमाच्या माध्यमातून मतदारसंघातील प्रत्येक गावात जावून लोकांशी संवाद साधण्यास प्राधान्यक्रम असल्याची ग्वाही दिली.
विखे म्हणाले, खासदार आपल्या गावी हा नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला असून त्यासाठी मतदारसंघातील सर्व गावात जावून लोकांच्या सार्वजनिक व वैयक्तिक अडचणी समजावून घेवून त्यानुसार प्रत्येक तालुक्याचा विकास आराखडा तयार करून प्राधान्यक्रमानुसार गावपातळीवरील समस्यांना न्याय देण्याचा आपला प्रयत्न आहे.