अमरधाम व कब्रस्थानमधील सुविधांसाठी कॉ.नांगरे यांची गांधीगिरी
शेवगाव – येथील अमरधाम व कब्रस्थानमध्ये पाणी, प्रकाश व संरक्षण भिंत तसेच स्वच्छता आदी मूलभूत सुविधा नसल्याने येथील कॉम्रेड संजय नांगरे यांनी आज स्वतःची जिवंतपणीच अंत्ययात्रा काढून गांधीगिरी करत निषेध नोंदविला. शहराची लोकसंख्या 40 हजाराच्यावर गेल्याने येथील अमरधाममध्ये जवळपास रोजच अंत्यसंस्कार होत असतात. मात्र येथे कमालीची अस्वच्छता असून पाण्याची व रात्रीच्यावेळी पुरेशा प्रकाशाची सोय नसल्याने अंत्यसंस्कारासाठी आलेल्या नागरिकांचे हाल होतात.
यासंदर्भात कॉम्रेड नागरे यांनी 28 नोव्हेंबर 2018 लाही अशाच प्रकारचे आंदोलन केले होते. मात्र तरीही नगरपरिषदेच्या प्रशासनाला जाग आलेली नाही. त्यामुळे आज नांगरे यांनी स्वतःची अंत्ययात्रा काढून पुन्हा एकदा प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.
येथील आंबेडकर चौकातून त्यांची अंत्ययात्रा काढून पैठण रस्त्यावरील अमरधाममध्ये नेण्यात आली. यावेळी त्यांच्या अंत्ययात्रेत भाकपचे कार्यकर्ते, सम्राट अशोकनगर ग्रुप, भिमराजे हेल्थ क्लब, लहूजी ग्रुप, नाईकवाडी मोहल्ला व इदगाह मैदान यंग ग्रुपचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
अंत्ययात्रा स्मशानभूमीत गेल्यानंतरही त्याची दखल घेण्यात न आल्याने नांगरे, समद काझी व क्रांती मगर यांनी तेथेच उपोषण सुरू केले आहे.