पिंपरी – हातात कोयते घेऊन सोशल मीडियावर दहशत निर्माण करणारा आणि आमची सूत्रे येरवडा जेलमधून हालतात, असे सांगणारा पिंपरी-चिंचवडमधील स्वयंघोषित “यमभाई’ पोलिसांपुढे येताच गोगलगाय झाला. ही घटना बुधवारी (दि. 14) घडली.
मयूर अनिल सरोदे ऊर्फ यमभाई (वय 21, रा. दुर्गानगर, निगडी-भोसरी रोड, आकुर्डी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर यापूर्वी गंभीर दुखापत करण्याचा गुन्हा दाखल आहे. सोशल मीडियावर हातात कोयते घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या दोन पोस्ट त्याने टाकल्या होत्या.
तसेच तिसऱ्या पोस्टमध्ये त्याने आमची सूत्र येरवडा जेलमधून हालतात, असे सांगत थेट पोलिसांनाच आव्हान दिले होते. याबाबत गुंडा विरोधी पथकाचे सहायक निरीक्षक हरीश माने यांना माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याला सापळा लावून ताब्यात घेतले. त्याच्या विरोधात निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सध्या सोशल मीडियावर आपले लक्ष केंद्रित केले आहे. 15 दिवसांपूर्वी निगडी येथील एका ग्रुपमध्ये अशाच प्रकारे हत्यार घेऊन फोटो टाकणाऱ्यावर गुंडा विरोधी पथकाने कारवाई केली होती. तसेच सराईत गुन्हेगार अजय काळभोर आणि त्यांच्या साथीदारांवरही गुंडा विरोधी पथकाने कारवाई केली. त्याला एक महिन्यासाठी न्यायालयाने निगडीच्या हद्दीतून तडीपार केले होते.
त्यानंतर आता पुन्हा सरोदे याच्यावर कारवाई केली आहे. त्यामुळे सोशल मीडियावरून हत्यार हातात घेत दहशत निर्माण करणाऱ्यावर पोलिसांनी आपला निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे.