शिवरामकृष्णन यांनी व्यक्त केली वस्तुस्थिती
नवी दिल्ली – कर्णधार विराट कोहलीपेक्षा भारतीय संघातील गोलंदाज महेंद्रसिंग धोनीलाच सर्वाधिक पसंती द्यायचे, अशा शब्दांत माजी कसोटीपटू व समालोचक लक्ष्मण शिवरामकृष्णन यांनी वस्तुस्थिती विशद केली. धोनीचे सल्ले गोलंदाजांना जास्त लाभदायक ठरत होते व संघातील गोलंदाज कोहलीपेक्षाही धोनीकडूनच जास्त मार्गदर्शन घेत होते, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
धोनी कर्णधार असताना संघातील सर्व गोलंदाज त्याचा सल्ला घ्यायचे. धोनीकडे प्रतिस्पर्धी फलंदाजांच्या खेळातील दोष ओळखण्याची अफाट क्षमता होती. खुद्द कुलदीप यादवनेच याबाबत सोशल मीडियावर अनेकदा किस्से सांगितले आहेत. कोणता फलंदाज त्या ठराविक दिवशी कसा खेळ करत आहे, त्याच्या बॅटच्या मध्यावर चेंडू कनेक्ट होतोय का, त्याचे फुटवर्क कसे आहे, त्याला कसे चेंडू टाकायचे व तो कसा बाद होऊ शकतो याची इत्यंभूत माहिती धोनी द्यायचा व त्यानुसार गोलंदाज गोलंदाजी करायचे व यशदेखील मिळवायचे, असेही ते म्हणाले.
जेव्हा कोहलीकडे नेतृत्व आले तेव्हा गोलंदाजांना त्याच्याशी संवाद साधताना दडपण यायचे. धोनी एक शांत खेळाडू होता. मात्र, कोहली तापटपणा करायचा त्यामुळे कोहलीकडे सल्ला घ्यावा की नाही असा प्रश्न गोलंदाजांना सतावतो, असेही शिवरामकृष्णन यांनी सांगितले.