येरवडा – विश्रांतवाडी येथील आळंदी रस्त्यावरील मेडिकलजवळ एका व्यक्ती मृतावस्थेत आढळला. तब्बल चार तासानंतर या व्यक्तीचा मृतदेह पुढील सोपस्कार पूर्ण करण्यासाठी ससून रुग्णालयात पाठवल्याचे पोलिसांनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, हा व्यक्ती या परिसरात मागील काही दिवसांपासून येथे भीक मागत होता. मागील 2-4 दिवसांत तो काही खातही नव्हता. या व्यक्तीचे वय साधारण 40 ते 45 असावे. रविवारी दुपारी तो अत्यवस्थ आढळला. त्यानंतर पोलिसांना कळवण्यात आले.
मात्र, पोलीस येण्यापूर्वीच त्याचे निधन झाले. करोनाच्या पार्श्वभूमीवर त्याच्याजवळ जाण्यास कोणीही तयार नव्हते. त्यामुळे मृत्यूदेह सुमारे चार तास रस्त्यावर पडून होता. पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागला पोलिसांनी फोनवरून माहिती दिली. मात्र, “आमच्याकडे शववाहिका आहे. पण, मृतदेह उचलण्यास माणसे नाहीत’ असे उत्तर देण्यात आले. शववाहिका दोन तासानंतर आल्यानंतर विश्रांतवाडीचे पोलीस निरीक्षक रवींद्र कदम यांनी येरवडा क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त विजय लांडगे यांना फोन करून माणसे व कोविड 19चे किट देण्यास सांगितले.
लांडगे यांनीही तत्परतेने माणसे व किट पाठवून देण्याची व्यवस्था केली. त्यानंतर सुरक्षेची सर्व काळजी घेत तो मृतदेह ससूनला पाठवला. प्रभाग 1च्या नगरसेविका ऐश्वर्या जाधव, सामाजिक कार्यकर्ते आशुतोष जाधव यांनी पालिकेच्या आरोग्य कर्मचारी बोलावून तेथील परिसर निर्जंतुकीकरण करून घेतला.