लोणावळा -लोणावळ्याच्या दऱ्या-खोऱ्यांमध्ये हरवलेल्या दिल्लीच्या तरुणाचा मृतदेह सापडला आहे. अभियंता असलेला हा तरुण ड्युक्सनोज परिसरात शुक्रवारी दुपारी दोन वाजल्यापासून बेपत्ता होता. मागील सलग पाच दिवस त्याचा विविध पद्घतीने शोध सुरू होता. मंगळवारी सकाळी आयएनएस शिवाजीच्या शोधपथकाला ड्युक्सनोजच्या पायथ्यापासून खाली 350 फूट खोल दरीत तरुणाचा मृतदेह सापडला.
लोणावळा पोलीस, आयएनएस शिवाजी, एनडीआरएफ, लोणावळ्यातील शिवदुर्ग मित्र, खोपोली येथील यशवंती हायकर्स आणि वन्य जीव रक्षक, मावळ मागील पाच दिवसांपासून तरुणाचा शोध घेत होते. फरहान अहमद सेराज्जुद्दीन असे या हरविलेल्या अभियंत्याचे नाव असून ते एका रोबोट बनविण्याच्या कंपनीत तो काम करतो. ते एका शासकीय कामानिमित्त कोल्हापूरला गेले होतो. गिर्यारोहणाची आवड असल्याने कोल्हापूर व पुणे येथील काम उरकल्यानंतर ते लोणावळ्यात आले होते.
भटंकती करत असताना आपण रस्ता चुकलो असल्याचे समजल्यानंतर त्यांनी भावाला फोन करून रस्ता चुकल्याची माहिती दिली. त्यानंतर काही वेळात त्यांचा मोबाइल बंद झाला. त्यांच्या भावाने लोणावळा पोलिसांशी संपर्क साधत याबाबतची माहिती दिली. लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक सिताराम डुबल यांच्यासह पोलीस ठाण्यातील कर्मचारी, शिवदुर्ग मित्र या रेस्कू पथकातील स्वंयसेवक, खोपोली येथील यशवंती हायकर्स सदस्य व कुरवंडे गावातील तरुण त्याचा शोध घेत होते. दोन दिवस पोलिसांनी श्वान पथकाच्या माध्यमातून देखील शोध मोहीम राबवली. त्यानंतर आयएनएस शिवाजी, एनडीआरएफचे पथक देखील या शोध मोहिमेत सहभागी झाले होते.
नातेवाइकांनी जाहीर केले होते बक्षीस
उंच डोंगर व दऱ्या त्यामध्ये घनदाट झाडी असा हा परिसर असल्याने शोध मोहिमेत अडचणी येत होत्या. शोध लागत नसल्याने सोमवारी चौथ्या दिवशी त्याच्या नातेवाइकांकडून या युवकाचा शोध घेणाऱ्यास एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. अखेर मंगळवारी सकाळी आयएनएस शिवाजीच्या शोधपथकाला ड्युक्सनोजच्या पायथ्यापासून खाली 350 फूट खोल दरीत फरहान अहमद सेराज्जुद्दीन हा मृतावस्थेत मिळून आला.