आठवडाभरात सुरू होणार पालिकेचे भोसरी रुग्णालय

काम अंतिम टप्प्यात ः 100 बेडची क्षमता असलेले रुग्णालय

स्त्री रोग, बालरोग विभाग जुन्या रुग्णालयातच

भोसरीच्या नव्या रुग्णालयात पाच विभाग सुरु होणार आहेत. मात्र, सद्यस्थितीत स्त्री रोग विभाग व बालरोग विभाग जुन्या रुग्णालयात ठेवले जाणार आहेत. पुढील काही दिवसांत दोन्ही विभाग नवीन रुग्णालयात स्थलांतरित केले जाणार आहेत. भोसरीचे जुने रुग्णालय बंद न ठेवता सद्यस्थितीत दोन विभागांचे कामकाज सुरु राहणार आहे.

पिंपरी  – महापालिकेच्या भोसरी रुग्णालयाचे काम अंतिम टप्यात आले आहे. रुग्णालयाचे बाह्य रुग्ण तपासणी विभाग (ओपीडी) व इतर विभाग आठवडाभरात सुरु होणार आहेत. भोसरी रुग्णालयाची इमारत प्रशस्त असून रुग्णालयात 100 बेडची क्षमता असल्याने नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे.

भोसरी परिसराचा वाढलेल्या विस्तारामुळे रुग्णालयात येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, रुग्णालयाची अपुरी जागा व पार्किंग व्यवस्था सुस्थितीत नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. रुग्णालयात डॉक्‍टर व रुग्णांनाही अनेक अडथळ्यांचा सामना करत रुग्णांवर उपचार करावे लागत आहेत. तसेच, रुग्णालयात बेडची संख्या कमी असल्याने रुग्णांना दाखल करुन घेताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. परंतु, नव्याने बांधण्यात आलेल्या रुग्णालयात अनेक सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत.

या ठिकाणी अस्थिरोग विभाग, दातांचा विभाग, एक्‍स-रे विभाग, ओपीडी विभाग, शस्त्रक्रिया विभाग व दोन अतिदक्षता विभाग सुरु होणार आहेत. नवीन रुग्णालयातील बेडची संख्या वाढविण्यात आल्याने सुमारे 100 रुग्णांवर उपचार करणे शक्‍य होणार आहे. शहरात पालिकेची एकूण 7 रुग्णालये व 29 दवाखाने आहेत. शहरासोबत जिल्हाभरातून रुग्ण उपचारासाठी येतात. मात्र, भोसरी रुग्णालय सुरु झाल्यानंतर शहरातील वायसीएम रुग्णालयावरील ताण कमी होणार असल्याने भोसरी रुग्णालयाचा विस्तार करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. या ठिकाणी रुग्णांलयासाठी प्रशस्त इमारत बांधण्यात आली आहे. भोसरी रुग्णालय मल्टिस्पेशालिटी असल्याने त्या ठिकाणी प्रशस्त वाहनतळ, अद्ययावत अग्निशमन यंत्रणा बसविण्यात आली आहे. तसेच, सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.

रुग्णालय सुरू होताना विविध विभागात आठ ते दहा डॉक्‍टरांची नियुक्ती करण्यात येणार आहे. भोसरी रुग्णालयात रोज बाह्य रुग्ण तपासणी विभागात सुमारे 200 ते 250 रुग्ण येत असून रुग्णांना उत्तम सुविधा पुरविल्या जाणार आहेत. तसेच, रुग्णालयात नव्याने डिजिटल मशीन बसविण्यात आलेल्या आहेत. भोसरी रुग्णालय सुरु झाल्यानंतर वायसीएम रुग्णालयावरील ताण निश्‍चितपणे कमी होणार आहे.

– डॉ. शंकर जाधव, वैद्यकीय उपअधीक्षक, वायसीएम रुग्णालय

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)