नवीन वर्षाची सुरुवात गोड होणार! लसीकरणाबाबत पुनावाला यांची महत्वपूर्ण माहिती

पुणे – ऑक्‍सफर्ड ऍस्ट्राझिंका लस वापराला या महिन्याच्या अखेर परवानगी मिळेल. लसीकरण जानेवारी महिन्यात सुरू होईल, अशी अपेक्षा या लसीचे उत्पादक असणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी व्यक्त केली.
इकानॉमिक टाईम्सच्या जागतिक व्यवसाय परिषदेत पुनावाला बोलत होते.

भारतातील प्रत्येकाला ऑक्‍टोबर 2021 पर्यंत लस मिळेल. त्यानंतर सामान्य जनजीवन सुरळित होऊ शकेल. या महिन्याच्या अखेरपर्यंत आम्हाला लसीच्या आपत्कालीन वापराचा परवाना मिळण्याची शक्‍यता आहे. मात्र त्याच्या व्यापक वापरासाठी नंतर परवाना मिळू शकतो. एकदा भारताच्या नियामकांनी परवानगी दिल्यानंतर भारताची लसीकरण मोहीम जानेवारी 2021 पर्यंत सुरू होऊ शकते.

एकदा 20 टक्के भारतीयांचे लसीकरण झाले की आपल्यात आत्मविश्‍वास निर्माण होईल. तशी भावना निर्माण होईल. त्यानंतर ऑक्‍टोबर महिन्यापर्यंत संपूर्ण देशाचे लसीकरण झाल्यानंतर जनजीवन सुरळीत होईल, असे ते म्हणाले.

भारतात करोना लशीच्या आपत्कालीन वापरासाठी तीन कंपन्यांनी अर्ज केला आहे. त्याची तज्ज्ञांच्या समितीकडून पडताळणी करण्यात येत आहे. सीरममध्ये निर्माण करत असलेल्या कोविशिल्ड या लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचण्याच्या सुरक्षा अहवाल मागवला आहे. त्याचबरोबर इंग्लंडमध्ये आपत्कालीन वापरासाठी केलेल्या अर्जाचा छाननी अहवाल मागवण्यात आला आहे. केवळ सीरमनेच 14 नोव्हेंबरपर्यंतचा सुरक्षा अहवाल या समितीत सादर केला आहे, असे पुनावाला यांनी स्पष्ट केले.

या लसीच्या 19 चाचण्यांचा अहवाल द लान्सेटने प्रकाशित केला आहे. या लसीचे दोन पूर्ण डोस दिले तर त्याची परिणामकारकता 62 टक्के आढळली. तर आधी आर्धा डोस आणि त्यानंतर पूर्ण डोस दिल्यानंतर त्याची परिणामकारकता 90 टक्के आढळली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.