पुणे : जिल्हा निवडणूक प्रशासनाने मतदार यादी शुद्धीकरणासाठी विशेष प्रयत्न केले असल्याने मतदार यादीत कोणतेही दोष नसून, काही ठिकाणी आढळलेल्या तांत्रिक त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे स्पष्टीकरण जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहे.आहे. भोर विधानसभा मतदारसंघातील काही नावे गुजरातमधील मतदारांची, तसेच बोगस असल्याबाबत तक्रारी आल्या होत्या. याची गंभीर दखल घेत जिल्हा प्रशासनाकडून कार्यवाही सुरू करण्यात आल्याचेही ते म्हणाले.
काय आहे प्रशासनाची भूमिका ?
याबाबत खुलासा करताना दिवसे म्हणाले, की निवडणूक आयोगाच्या निर्देशान्वये एका ठिकाणी मतदार यादीत असलेल्या व्यक्तीला दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित होण्यासाठी नमुना अर्ज क्र. ८ (स्थलांतर/पत्त्यात बदल) भरता येतो. राज्यातील विविध भागांतून, तसेच वेगवेगळ्या राज्यांतून मुळशी तालुक्यातील हिंजवडी, सूस, म्हाळुंगे, बावधन बु., माण, मारूंजी या भागांत रोजगार, नोकरी- व्यवसायानिमित्त स्थलांतर होत असल्याने तेथील नागरिक या भागात रहिवासास आल्यानंतर ऑनलाइन पद्धतीने नमुना अर्ज क्र. ८ भरत असतात.
त्याच अनुषंगाने याप्रकरणी ३ रहिवासाची कागदपत्रे तपासून अर्ज स्वीकृत करण्यात आला आहे. त्यानंतर हे मतदार यादीत समाविष्ठ झाल्यानंतर त्यांची नावे स्थानिक भाषेत रूपांतरीत करण्यात येत असतात. आतापर्यंत बाहेरच्या राज्यातून अशा प्रकारे स्थलांतरित झालेल्या मतदारांच्या नावाचे स्थानिक भाषेत रूपांतरण करण्यात आले असल्याचा दावाही त्यांनी या वेळी केला, तसेच मतदार यादीबाबत संभ्रम अथवा तक्रार असल्यास जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.