नवी दिल्ली – 68व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची आज घोषणा झाली असून “गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटाला सर्वोच्च मराठी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. तर अजय देवगणच्या “तान्हाजी’ला “लोकप्रिय हिंदी चित्रपटा’चा पुरस्कार जाहीर झाला आहे.
माहिती व प्रसारण मंत्रालयातर्फे आज पुरस्कार जाहीर झाले आहेत. नवी दिल्लीतील नॅशनल मीडिया सेंटरमध्ये 68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, हिंदी, मराठी, कन्नड, पंजाबी, तमिळ, तेलुगू, मणिपुरी यांसह इतर प्रादेशिक भाषांमधीलही पुरस्कार जाहीर केले जाणार आहेत.
आज जाहीर झालेल्या पुरस्कारामध्ये दिग्दर्शक शांतनू रोडे यांचा “गोष्ट एका पैठणीची’ हा चित्रपट सर्वोत्कृष्ट ठरला आहे. तर “मी वसंतराव’साठी राहुल देशपांडे यांना सर्वोत्कृष्ट गायकाचा पुरस्कार मिळाला आहे. तसेच “गोदाकाठ’ आणि “अवांछित’ या चित्रपटांसाठी किशोर कदम यांना विशेष ज्युरीचा पुरस्कार मिळाला आहे.
“तान्हाजी’ने राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात दोन पुरस्कार पटकावले आहेत. याच चित्रपटासाठी अजय देवगण यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच चित्रपटाने सर्वोत्कृष्ट वेशभूषेचा देखील पुरस्कार पटकाविला आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा मराठमोळ्या ओम राऊतने सांभाळली होती.
सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट म्हणून आशुतोष गोवारीकर निर्मिती संस्थेच्या “तुलसीदास ज्युनियर’ या चित्रपटाला जाहीर झाला आहे. तसेच पदार्पणातील विशेष उल्लेखनीय चित्रपट म्हणून पुण्याच्या एमआयटी संस्था निर्मित “परिह’ या चित्रपटाचे नाव जाहीर झाले आहे.
कोणाला कोणते पुरस्कार?
गोष्ट एका पैठणीची – सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट
राहुल देशपांडे – सर्वोत्कृष्ट पार्श्वगायन (मी वसंतराव)
विशेष पुरस्कार – सिद्धार्थ मेनन (जून)
विशेष ज्युरी पुरस्कार – किशोर कदम (गोदाकाठ आणि अवांछित)
सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट – फ्युनरल
सर्वोत्कृष्ट बालकलाकार मराठी चित्रपट : अनिश गोसावी (टकटक), आकांक्षा पिंगळे, दिव्येश इंदुलकर (सुमी)
हिंदीतील पुरस्कार
सर्वोत्कृष्ट अभिनेता – अजय देवगण (तान्हाजी – द अनसंग व्हॉरियर)
सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन – विशाल भारद्वाज (1232 किलोमीटर मरेंगे तो वहीं जाकर)
सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट पुरस्कार – जस्टिस डिलेड बट डिलिव्हर्ड आणि थ्री सिस्टर्स
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – अपर्णा बालमुरली
सर्वोत्कृष्ट गीतकार – मनोज मुंतशीर