हैदराबाद – दिवसभर गेमिंगचे व्यसन मानसिक आजारी बनवत आहे. त्याचे वाईट परिणाम समोर येत आहेत. हैदराबादमधून अशीच एक घटना समोर आली आहे. गेमिंगचे व्ह्यूवर्स घटल्याने एका यूट्यूबरने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 23 वर्षीय मुलाने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली. मृत तरूण आयआयआयटीएम ग्वाल्हेर येथे शिकत होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपार्टमेंटच्या वॉचमनला इमारतीवरून काहीतरी पडण्याचा आवाज आला, त्यानंतर त्याने जवळ जाऊन पाहिले तर विद्यार्थी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला.
सुसाईड नोटमध्ये व्ह्यूवर्स घटल्याचा उल्लेख –
घटनास्थळी पोलिसांना सुसाईड नोट सापडली आहे. या नोटमध्ये विद्यार्थ्याने लिहिले आहे की, त्याच्या यूट्यूब चॅनलवरील व्ह्यूअर्सच्या घटत्या संख्येमुळे तो दु:खी होता. त्यामुळेच त्याने आत्महत्या केली. विद्यार्थ्याचे पालक दोघेही नोकरी करतात. विद्यार्थ्याने सुसाईड नोटमध्ये असेही म्हटले आहे की, त्याला एकटेपणा जाणवत होता आणि त्याच्या आयुष्याबद्दल निराशा झाली होती. हा विद्यार्थी SELFLO नावाचे यूट्यूब चॅनल चालवत असे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.