कोरेगाव – जिहे-कठापूर उपसा सिंचन योजनेच्या वर्धनगड येथील बोगद्यामध्ये रामोशीवाडी, शेलटी, खिरखिंडी, भाटमवाडी या गावाना पिण्याचे पाणी मिळावे म्हणून काढण्यात आलेला आउटलेट जलसंपदा विभाग व पोलीस अधिकाऱ्यांनी रविवारी रात्री 2 वाजता चोरासारखे येऊन बंद करण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्रातील अशी ही पहिलीच घटना असल्याचे सांगत माजी जलसंपदा मंत्री आ. शशिकांत शिंदे यांनी या घटनेचा निषेध केला.
आउटलेट बंद केल्या घटनेनंतर पत्रकारांशी आ. शशिकांत शिंदे यांनी संवाद साधला. ते म्हणाले, कोणत्याही परिस्थितीत या लोकांना पाणी मिळू द्यायचे नाही अशी आमदाराची ईर्षा आहे. त्यामुळे ते अधिकाऱ्यांवर दबाव टाकत आहेत. आणि दिवसा काम करणारे अधिकारी चोरांसारखे रात्री का आलात? याचा जबाब द्या अन्यथा आपण रस्त्यावर उतरण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
आ. शशिकांत शिंदे पुढे म्हणाले, रामोशीवाडी, शेलटी, खिरखिंडी, भाटमवाडी ही कोरेगाव तालुक्यातील चार गावे कायम दुष्काळी म्हणून ओळखली जात होती. या चार गावांना दरवर्षी टॅंकरने पाणी पुरवठा करावा लागत असे. आपण जलसंपदामंत्री असताना या गावाचा दुष्काळग्रस्त शिक्का पुरावा तसेच ही गावे टॅंकरमुक्त व्हावीत म्हणून जिहे कठापूर योजनेतून या ठिकाणी आउटलेट काढून दिला होता. परंतु रविवारी रात्री 2 वाजण्याच्या सुमारास जलसंपदा विभागाचे अधिकारी व पोलीस अधिकारी रात्री वर्धनगड बोगद्यात रात्री 2 वाजता वेल्डिंगच्या साहित्यासह आले. त्यांनी चोरासारखे येऊन हा आउटलेट वेल्डिंग करून बंद करण्याचा प्रत्यन करून महापाप केले आहे. या अधिकाऱ्यांना याबाबत आम्ही जाब विचारणार असून जोपर्यंत उत्तर मिळत नाही तोपर्यंत त्यांच्या दालनात बसून राहणार आहे. आ. महेश शिंदेंसह आपणही भाडळे, जांब, चंचळी, कवडेवाडीला पाणी मिळावे म्हणून शिफारस केली आहे.
त्याचप्रमाणे रामोशीवाडी, भाटमवाडी, शेलटी, खिरखिंडीला पाणी मिळावे म्हणून आ. महेश शिंदेची शिफारस असल्याचे स्पष्ट करत आ. शशिकांत शिंदे पुढे म्हणाले, एकीकडे पाणी देण्याची शिफारस करायची दुसरीकडे मात्र अधिकाऱ्यांवर दबाव टाकणे योग्य नाही. निवडून आल्यानंतर लोकांसाठी काम करण्याची भूमिका ठेवली पाहिजे. परंतु आमदाराना आपल्या ईर्षेसाठी येथील लोकांना पाणी मिळू द्यायचे नाही. परंतु राजकारणातील त्यांची ही भूमिका योग्य नसल्याचे स्पष्ट करत महाराष्ट्राच्या राजकारणात अशा घटना कधी घडल्या नसल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. यापुढील आमचे युद्ध येथील आमदाराविरोधात नसून चोरून येऊन पाणी बंद करून चुकीचे वागणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात असणार असल्याचेही आ. शशिकांत शिंदे यांनी यावेळी सांगितले.