पुणे – खासगी रुग्णालयातील वाढीव बिल, दरपत्रके, सुविधा यासह रुग्णहक्कांची पायमल्ली करणाऱ्या रुग्णालयांबाबत तक्रार नोंदवता येणार आहे. यासाठी पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून तक्रार निवारण कक्ष स्थापन केला आहे. टोल-फ्री क्रमांकावर किंवा प्रत्यक्ष आरोग्य विभागात ही तक्रार नागरिकांना मांडता येणार आहे.
राज्यातील काही मोजक्यात महापालिका आणि जिल्हा परिषद सोडल्या, तर अन्य कोठेच रूग्णांच्या तक्रारी एकुण घेण्यासाठी “तक्रार निवारण कक्ष’ नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तत्काळ आरोग्य विभागांनी हे कक्ष सुरू करावे, अशी मागणी जन आरोग्य अभियानासह अन्य आरोग्य क्षेत्रात कार्य करणाऱ्या आरोग्य कार्यकत्यांनी केली. उपचारांचे दरपत्रक, उपचारांची उपलब्धता आहे किंवा नाही याबाबी दर्शविणारे सर्वांना सहजपणे दिसेल आणि वाचता येतील अशा सुस्पष्ट रितीने मराठी, इंग्रजी भाषेत रुग्णालय किंवा नर्सिंग होमच्या दर्शनी भागात तातडीने प्रदर्शित करण्याचे आदेश पालिकेने रुग्णालयांना बजावले आहेत, असे रुग्ण हक्क मोहिमेचे दीपक जाधव यांनी सांगितले.