पुणे – भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेतर्फे (आयसर, पुणे) टाटा टेक्नॉलॉजीच्या “सीएसआर’च्या माध्यमातून पुढील दोन वर्षांत 400 शिक्षक, 2 हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. विद्यार्थ्यांना परिणामकारक शैक्षणिक वातावरणासाठी शिक्षकांना सक्षम करण्यासाठी “आयसर’ने पुढाकार घेतला आहे. आयसर येथील “इंद्राणी बालन सायन्स ऍक्टिव्हिटी सेंटरमध्ये स्टेम टिंकरिंग अनुभव केंद्र’ सुरू करण्यात आले.
टाटा टेक्नॉलॉजीच्या “सीएसआर’ विभागाचे प्रमुख विक्रांत गंधे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. सुजित दीक्षित, सिद्धार्थ यवलकर, कर्नल राज शेखर, प्रा. संथानम, डॉ. अपर्णा देशपांडे, शुभांगी वानखेडे यावेळी उपस्थित होते. कमी खर्चात, सहज मिळणाऱ्या वस्तूंपासूनचे अनेक प्रयोग येथे समाविष्ट आहेत. स्टेम रेडी प्रकल्पांतर्गत शिक्षकांना विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित नवीन शैक्षणिक पद्धतींचा अभ्यासक्रमात समाविष्ट करून अध्यापन करण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
इंद्राणी बालन सायन्स केंद्र येथे मार्गदर्शन
स्टेम टिंकरिंग अनुभव केंद्राची रचना विद्यार्थी, शिक्षकांना वेगळा शैक्षणिक अनुभव मिळण्याच्या दृष्टीने करण्यात आली आहे. या केंद्रात विद्यार्थ्यांना विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणितातील विविध प्रयोगांसाठी लागणारी विविध साधने, उपकरणे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.