शिक्रापूर (पुणे) -शिक्रापूर (ता. शिरूर) परिसरात दुचाकीहून हत्यारे घेऊन फिरणाऱ्या तिघांना शिक्रापूर पोलिसांनी दुचाकी व हत्यारासह जेरबंद केले. हत्यारे घेऊन फिरणारे हे तिघेजण कोंढापुरी परिसरातील एका कंपनीच्या व्यवस्थापकावर हल्ला करण्यासाठी निघाले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
अनिकेत अर्जुन मंडलिक (वय 20, रा. पाषाण सोमेश्वरवाडी), अजित रावसाहेब थोरात (वय 20, रा. विघ्नहर्ता कॉलनी, शिक्रापूर) व निवृत्ती उर्फ विराज ज्ञानोबा येमघर (रा. पाषाण सोमेश्वरवाडी; मूळ रा. मंजरत, ता. माजलगाव) अशी टटक करण्यात आलेलेया तिघांची नावे आहेत. शिक्रापूर पाबळ चौकामध्ये पोलीस शिपाई मिलिंद देवरे हे त्यांच्या काही सहकाऱ्यांसोबत नाकाबंदी करत असताना त्यांना एका बिगर नंबरच्या दुचाकीहून हे तिघे हत्यांरासह मिळून आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता ते तिघे जण कोंढापुरी येथील प्रमोद गायकवाड यांच्या सांगण्यावरून गायकवाड यांना कोंढापुरी येथील एका नामांकित कंपनीमध्ये कामाचा ठेका मिळविण्यासाठी कंपनीच्या व्यवस्थापकावर हल्ला करण्यासाठी चालले असल्याची माहिती मिळाली आहे; मात्र शिक्रापूर पोलिसांच्या सतर्कतेमुळे कंपनी व्यवस्थापकावर होणारा हल्ला रोखला गेला. गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किरण भालेकर हे करीत आहेत.