बूट भिरकावणाऱ्या मदन आढावला अटक

सरकारी कामात अडथळा प्रकरणी राठोड यांच्यासह 11 जणांवर गुन्हा दाखल
शहर अभियंता विलास सोनटक्के यांनी दिली पोलिसांत फिर्याद

नगर –
महापालिका आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांच्या दालनात शहर अभियंता विलास सोनटक्के यांच्या दिशेने बूट भिरकावून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी शिवसेना उपनेते माजी आमदार अनिल राठोड यांच्यासह पक्षाचे नगरसेवक व कार्यकर्त्यांविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हे दाखल करण्यात आला. याप्रकरणी बूट भिरकावणारा मदन आढाव याला पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत माहिती अशी की, महापालिकेत शुक्रवारी आंदोलनाच्या दरम्यान, शहर अभियंता यांच्यावर बूट भिरकावला होता. शहर अभियंता विलास सोनटक्के यांनी याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. दरम्यान, महापालिकेतील अभियंत्यांनी बूट भिरकावल्या प्रकाराचा निषेध केला. निषेध व्यक्त करण्यासाठी महापालिकेतील सर्व अभियंत्यांनी बेमुदत रजेवर जाण्याचा इशारा दिला. महापालिका आयुक्तांना तसे निवेदन देण्यात आले होते. तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद देत असताना रात्री उशिरापर्यंत अतिक्रमण विभागाचे प्रमुख सुरेश इथापे, प्रकल्प अभियंता राजेंद्र मेहत्रे, बांधकाम विभागाचे शाखा अभियंता श्रीकांत निंबाळकर, मनोज पारखे व राहुल साबळे आणि महापालिका कामगार युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे उपस्थित होते.

महापालिका कामगार युनियनने या प्रकाराचा निषेध व्यक्त करण्यासाठी सोमवारी आंदोलनाचा इशारा दिला. तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल होताच शिवसेनेचाही पदाधिकाऱ्यांनी तिथे धाव घेतली. मात्र, रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये नगरसेवक अशोक बडे, नज्जू पहिलवान, नगरसेविका कमल सप्रे, रिता भाकरे, माजी नगरसेवक दत्ता सप्रे, मदन आढाव, शैलेश भाकरे, आकाश कातोरे, माजी आमदार अनिल राठोड, विशाल वालकर, गिरीष जाधव व इतर 20 ते 25 अनोळखी व्यक्तींचा समावेश आहे.

पोलिसांनी याप्रकरणी मदन आढाव यास तातडीने अटक केली आहे. गुन्हे दाखल झालेले आरोपी शहरातून पसार झाले आहेत. त्यांच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा, जमावबंदी आदेशाचे शिवीगाळ, दमदाटी आदी कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.