अनामत रक्कम व भाडे परवडत नसल्याने फिरकेनात विक्रेते

जनार्दन लांडे
शेवगाव – दिवंगत आमदार राजीव राजळे यांनी दिलेल्या शब्दाची स्वप्नपूर्ती करण्याच्या उद्देशाने आमदार मोनिकाताई राजळे यांनी ग्रामविकासमंत्री पंकजाताई मुंडे यांच्या विशेष सहकार्यातून शेवगाव येथे तब्बल सव्वा कोटीचा निधी खर्चून उभारलेल्या अद्ययावत भाजीमंडईचे सहा महिन्यापूर्वी वाजत गाजत उद्‌घाटन होऊनही ती लालफितीत अडकल्याने आजही तिला टाळे आहे.

शेवगावच्या आठवडे बाजाराच्या जागेवर अद्ययावत सर्वसोयीने युक्त असे 48 गाळे असलेली भव्य व आकर्षक वास्तू उभारण्यात आली. सहा महिन्यापूर्वी या इमारतीचे वाजत गाजत उद्‌घाटनही करण्यात आले. नियमानुसार टाऊन प्लॅनिंग विभागाकडून (मुख्याधिकारी, जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिनिधी व टाऊन प्लॅनिंग अशा त्रिसदस्य समितीकडून) येथील गाळ्याचे सरकारी मूल्यांकन करवून घेण्यात आले, आणि येथेच माशी शिंकली. या विभागाने एका गाळ्यासाठी एक लाख 45 हजार रुपये अनामत रक्कम व 1 हजार 215 रुपये महिना गाळा भाडे घेण्याचे मुल्यांकन केले. हातावर पोट असणाऱ्या सर्वसामान्य रोज दीड – दोनशे रुपये मुश्‍किलीने मिळविणाऱ्या भाजी व फळ विक्रेत्यांना हे आवाक्‍याबाहेरचे असल्याने ती सुरू होणे रखडले आहे.

शेवगावात सुमारे पन्नास भाजीपाला व फळविक्रेते आहेत. रस्त्यावर मोकळ्या जागेत बसून रोज चार पाचशे रुपयांच्या भांडवलावर खेळणारी ही मंडळी जास्तीत जास्त शे दोनशे रुपये रोज मिळतात. आज बाहेर कुठेही बसल्यावर नगरपालिकेने त्यांचेकडून पाच रुपये कर वसूल करते. तो ते खुशीने देतात. मात्र नवीन इमारतीमध्ये व्यवसाय करण्यासाठी नगरपालिकेने प्रथम एक लाख 45 हजार अनामत व महिना 1 हजार 215 रुपये गाळा भाड्याची मागणी केल्याने कोणीही व्यवसायिक एवढी मोठी सहा आकडी अनामत रक्कम भरण्यास व रोजच्या शे-दोनशे च्या उत्पन्नातून 40 रुपये गाळा भाडे भरणेही त्यांना अशक्‍य असल्याने एवढी भव्य वास्तू उभारूनही उपयोगाविना पडून आहे. आज या नव्या वास्तूच्या दारातच भाजीपाला विक्रेत्यांनी आपला व्यवसाय थाटला आहे.

नगरपालिकेने सरकारी मूल्यांकनानुसार ही अनामत व भाडे मागणी केली, असल्याने यातून मार्ग काढण्यासाठी आमदार मोनिकाताई राजळे यांनीच लक्ष घातले तर हा प्रश्‍न लवकर सुटू शकेल व गोरगरिबांना न्याय मिळेल.

विष्णू डाके, भाजीविक्रेता, शेवगाव.

नगरपालिकेने गाळ्याच्या लिलावासाठी दोन वेळेस निविदा देऊनही व्यवसायिकांकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, ही वस्तुस्थिती असल्याने मूल्यांकनानुसार निर्धारित केलेली रक्कम कमी करण्याबाबतचा विनंती प्रस्ताव नगरालिका नगराध्यक्षा व नगरसेवकांच्या बॉडी मार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केलेले आहेत. निवडणुकीमुळे यावरील निर्णयास विलंब झाला. जिल्हाधिकारी वस्तुस्थिती पाहून त्यावर सकारात्मक निर्णय घेतील असा विश्‍वास वाटतो.

अंबादास गरकळ, मुख्याधिकारी शेवगाव नगरपालिका

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.