भोपाळ – मध्यप्रदेशातील समाजवादी पक्षाच्या (सप) एकमेव उमेदवाराचा अर्ज बाद ठरवण्यात आला. ती घडामोड सपा प्रमाणेच इंडिया या विरोधी पक्षांच्या आघाडीसाठी राजकीय हादरा ठरली आहे. (The application of SP’s only candidate in Madhya Pradesh is rejected)
लोकसभा निवडणुकीसाठी सप आणि कॉंग्रेस या इंडियाच्या घटक पक्षांनी जागावाटप निश्चित केले. त्यानुसार, उत्तरप्रदेशात सप, तर मध्यप्रदेशात कॉंग्रेस मोठ्या भावाच्या भूमिकेत आहे.
दोन्ही पक्षांमधील समझोत्यानुसार सपच्या वाट्याला मध्यप्रदेशातील खजुराहो लोकसभा मतदारसंघ आला. त्या जागेवर सपने मीरा यादव यांना उमेदवारी दिली. मात्र, त्यांचा उमेदवारी अर्ज शुक्रवारी फेटाळण्यात आला. बी फॉर्मवर स्वाक्षरी केली नसल्याचे कारण त्यासाठी देण्यात आले. आता अर्ज फेटाळण्याच्या निर्णयाला त्या उच्च न्यायालयात आव्हान देणार आहेत.
उमेदवारी अर्ज बाद ठरवण्यात आल्याच्या घडामोडीवर सपचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. संबंधित घडामोड म्हणजे लोकशाहीची हत्या आहे. त्या प्रकरणी न्यायालयीन चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. भाजपने खजुराहोमधून प्रदेशाध्यक्ष आणि विद्यमान खासदार व्ही.डी.शर्मा यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. भाजपने ती जागा २००४ या वर्षापासून सातत्याने जिंकली आहे.