स्वारगेट हबसाठी पाण्याच्या टाक्यांच्या जागेवरही डोळा
पुणे – महापालिकेकडून स्वारगेट येथील पाणी पुरवठ्याची तसेच पीएमपीएमएलची जागा मेट्रोचे भूमीगत स्थानक आणि ट्रान्सपोर्ट हबसाठी दिलेली आहे. असे असतानाही हबच्या कामाच्या नावाखाली महापालिकेकडून समानपाणी योजनेसाठी स्वारगेट येथे बांधण्यात येणाऱ्या पाण्याच्या तीन टाक्यांसाठी आरक्षित असलेल्या जागेवरही महामेट्रोचा डोळा आहे. ट्रान्सपोर्ट हबमध्ये पीएमपीएमएलच्या गाड्या वळविण्यासाठी जागा पूरत नसल्याचे कारण पुढे करत मेट्रोकडून पाण्याच्या टाकीच्या जागेची मागणी महापालिकेकडे करण्यात आली असल्याचे समोर आले आहे.
मेट्रोकडून स्वारगेट येथे भुयारी मेट्रोचे स्थानक तयार करण्यात येणार आहे. या स्थानकाची जागा तसेच या ठिकाणी मेट्रोकडून उभारण्यात येणाऱ्या ट्रान्सपोर्ट हबच्या जागेचा समावेश मेट्रोच्या आराखड्यात नव्हता. या ठिकाणी असलेल्या पाणीपुरवठा विभागाच्या जागेत महापालिकेकडून सुमारे 40 लाख लीटर क्षमतेच्या 5 ते 6 पाण्याच्या टाक्या समानपाणी योजनेसाठी प्रस्तावित केल्या होत्या. मात्र, मेट्रोकडून या जागेची मागणी केल्याने पालिकेकडून अवघ्या 3 पाण्याच्या टाक्या उभारण्याचा निर्णय घेत उर्वरित जागा महामेट्रोला देण्यात आली. त्यावेळी महामेट्रोकडून ट्रान्सपोर्ट हबच्या ठिकाणी पालिकेस पाण्याची टाकी उभारण्याचे आश्वासनही देण्यात आले. मात्र, आता अचानक ट्रान्सपोर्ट हबमध्ये व्यावसायिक इमारत उभारून मेट्रोचे उत्पन्नाचे साधन निर्माण करण्याच्या नावाखाली हबच्या नकाशात मेट्रोकडून बदल केले आहेत.
त्यामुळे हबसाठी मेट्रोला आणखी जागेची आवश्यकता भासत आहे. मात्र, या जागेत आता महापालिकेच्या 3 पाण्याच्या प्रस्तावित टाक्या आहेत. ही जागाही मेट्रोला दिल्यास या टाक्या उभारता येणार नसल्याचे पाणी पुरवठा विभागाचे मत आहे. त्यामुळे ही जागा मेट्रोला दिल्यास महापालिकेच्या समानपाणी योजनेतील प्रस्तावित कामांनाही पालिका हरताळ फासणार असल्याचे चित्र आहे.
पीएमपीएमएल बसेसचे दिले कारण
मेट्रोकडून ही वाढीव जागा मागण्यासाठी पीएमपीएमएल बसेसचे कारण महापालिकेत झालेल्या बैठकीत पुढे केले आहे. हब उभारण्यात आल्यानंतर या ठिकाणी पीएमपीएमएल बसेसला काही प्रमाणात अडथळे येत आहेत. हे अडथळे दूर करायचे असल्यास बसेससाठी वाढीव जागेची आवश्यकता असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे ट्रान्सपोर्ट हबचे काम सुरू करताना आणि त्याचा आराखडा करताना व्यावसायिक जागा उभारणीवर भर असलेल्या मेट्रोला पीएमपीएमएल आणि पाणी पुरवठ्याच्या अत्यावश्यक सेवांबाबत लक्ष देता आले नाही का असा प्रश्न महापालिकेकडून उपस्थित करण्यात येत आहे.