शिवलिंगावार सूर्यकिरणांचा अभिषेक

भुलेश्वर मंदिरात किरणोत्सव पाहण्यासाठी भाविकांची गर्दी

भुलेश्वर – महाराष्ट्रातील जागृत देवस्थान तसेच पुणे जिल्ह्यात शिल्पसौंदर्याचा खजिना म्हणून ओळख असणाऱ्या श्री भुलेश्वर मंदिरातील शिवलिंग व मूर्तीवर सोमवारी (दि. 16) सकाळी सूर्यकिरणांचा अभिषेक झाला. हा किरणोत्सव पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. यावेळी उपस्थित भाविकांनी हर हर महादेव व भुलेश्वर महाराज की जयचा जयघोष केला.

दरवर्षी 28 मार्च रोजी भुलेश्वर मंदिरात किरणोत्सव होतो. पण त्यावेळी उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे ढगाळ वातावरण नसते. त्यामुळे सरासरी 20 ते 25 मिनिटे किरणोत्सव चालतो, परंतु सोमवारी अवघे 5 मिनिटे किरणोत्सव झाला. याविषयी श्री भुलेश्वर देवस्थानचे पुजारी गणेश गाडेकर यांनी सांगितले की, सप्टेंबर महिन्यात सूर्यकिरण पिंडीपर्यंत येणे हा दुर्मिळ योग आहे. यापूर्वी 2002 साली असा योग आला होता. त्यानंतर 2014, 2017 साली किरणोत्सव झाला. सकाळी 6 वाजून 40 मिनिटांनी सूर्य किरणांनी भुलेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केला. त्यामुळे श्री भुलेश्वरांच्या मुखवट्यास सूर्याच्या सोनेरी किरणांमुळे सोनेरी झळाळी आली होती. त्यानंतर 6:47 वाजता ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने हा योग फक्त 7 मिनिटे टिकला.

सोमवार असल्याने यावेळी अनेक भाविकांना या दुर्मिळ योगायोगाचे दर्शन घेता आले. मंगळवारी चांगल्या प्रकारे व जास्त वेळ सूर्यकिरण पिंडीवर थांबणार अशी अपेक्षा मनात ठेवून अनेक भाविकांनी मंगळवारी देखील गर्दी केली. मात्र, मंगळवारी सूर्य ढगातून बाहेर न आल्याने भाविकांची निराशा झाली. सूर्यकिरण पाहण्यासाठी भुलेश्वर पंचक्रोशीतील माळशिरस, टेकवडी, यवत, कासुर्डी अशा परिसरातील भाविकांनी गर्दी केली होती.

  • नगारखान्यापासून शिवलिंग सरासरी 100 अंतर आहे व यामध्ये नगारखाण्यावरील भिंत, नंदीच्या मागील खिडकी, नंदीची मान असे विविध अडथळे पार करून सूर्यकिरण शिवलिंगापर्यंत जाते. हे एक भारतीय वस्तू कलेतील विशेषच मानावे लागेल.

Leave A Reply

Your email address will not be published.