लीगल ऍडव्हायजरच्या सल्ल्याने गुन्हा दाखल करणार : तहसीलसमोरील उपोषण तीन दिवसांनंतर मागे
राजगुरूनगर- मयताच्या वारसांनी खेड तहसील कार्यालयासमोर सोमवारी (दि. 16) सुरू केलेले उपोषण तिसऱ्या दिवशी बुधवारी (दि. 18) रात्री 9 वाजता तहसीलदार व पोलीस उपविभागीय अधिकारी यांनी दिलेल्या आश्वासनानंतर सोडण्यात आले.
दरम्यान उपोषणकर्त्यांवर उपोषण सोडण्याबाबत प्रशासनाचा दबाब आणायचा प्रयत्न झाल्याचे समजतात तालुक्यातील विविध संघटनांचे कार्यकर्ते एकत्र आल्याने आणि उपोषणकर्त्यांना न्याय मिळावा, अशी मागणी केल्याने प्रशासनाला नमती भूमिका घ्यावी लागली. लीगल ऍडव्हायजरचा सल्ला घेऊन मगच गुन्हा दाखल केला जाईल, या मुद्द्यावर उपोषणकर्त्यांनी उपोषण मागे घेतले. पाईट (ता. खेड) येथील चिखलवाडी गावातील गट क्रमांक 271 ही जमीन असून तिचे 2006 मध्ये खरेदीखत करण्यात आले. मात्र, जमिनीचे मुळ मालकाचा 1996 मयत झाले होते.
खरेदी करणाऱ्या व्यक्ती धनदांडग्या असल्याने त्यांनी बोगस परवानगी घेऊन व अज्ञात व्यक्ती उभी करून हे बोगस खरेदी खत केले आहे. मुळ मालकाचे वारस, नातेवाईक व शासनाची त्यांनी फसवणूक केली. त्यावरून मयताच्या कन्या मीरा गुलाब सोनवणे, त्यांच्या परिवारातील सदस्यांनी विविध ठिकाणी न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न केले. खेड तहसीलदार यांना देखील वारंवार माहिती देऊन निवेदन दिले. मात्र, न्याय मिळाला नाही. म्हणून सोमवारी (दि. 16) मीरा सोनवणे व त्यांच्या कुटुंबाबातील लहानमोठ्या 9 व्यक्तींनी उपोषण सुरू केले होते. तीन दिवस उपोषणाला झाल्यानंतर शासकीय पातळीवर हालचाली सुरू झाल्या.
सुरुवातीला लेखी आश्वासन तहसीलदार सुचित्रा आमले यांनी दिले. मात्र, त्यावर उपोषणकर्त्यांनी उपोषण न सोडण्याच्या निर्णयावर ठाम राहिले. जमीन खरेदीमध्ये दोषी असलेल्या व्यक्तींवर फसवणूक व ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी लावून धरली. दरम्यान, तीन दिवसांपासून उपोषणाला बसल्याने पोलिसांकडून उपोषण सोडण्याची मागणी करून पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला.
उपोषण मागे घेण्यासाठी दबाव येत असल्याचे लक्षात येतात विविध संघटनांचे अनेक कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले. अखेर पोलीस उपाधीक्षक गजानन टोम्पे, तहसीलदार सुचित्रा आमले, पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी, भीमशक्ती संघटनेचे जिल्हा अध्यक्ष विजय डोळस, शिवसेनेच्या जिल्हा संघटक विजया शिंदे, भीमाशंकर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ऍड सुरेश कौदरे, संदीप भोसले, गौतम सोनवणे, उपोषणकर्त्या मीरा सोनवणे, अनिल जाधव आदीमध्ये लीगल ऍडव्हायजरचे मत घेण्याचे मान्य करून त्यांचा अहवाल आल्यानंतर खोटे खरेदीखत करून फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला जाईल, असे सांगण्यात आल्यानंतर उपोषण सोडण्यात आले. यावेळी खेड तालुका आरपीआयचे अध्यक्ष ऋषिकेश डोळस, भीमशक्ती संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- लिंबू सरबताने उपोषणाची सांगता
उपोषण करणाऱ्या मिलिंद गुलाब सोनवणे, मिलिंद सोनवणे, राहुल सोनवणे, गौतमी सोनवणे, लक्ष्मीबाई सोनवणे, इंदुमती सोरटे, संस्कृती सोनवणे, समृद्धी सोनवणे यांना तहसीलदार सुचित्रा आमले यांच्या हस्ते लिंबू सरबत पाजून उपोषण मागे घेण्यात आले.