पिंपरी, दि. ७ – झोपडपट्टीत येऊन सीसीटीव्ही कॅमेरे बंद करण्याची धमकी देत अंधाधुंदपणे गोळीबार केल्याची घटना मंगळवारी (दि. ६) सायंकाळी साडेपाच वाजता लिंकरोडवरील पत्रा शेड येथे घडली. तिथून पुढे जाऊन आरोपींनी आणखी दोन ठिकाणी गोळीबार केला. अंधाधुंदपणे गोळीबार करून पळून गेलेल्या तिघांना पोलिसांनी अवघ्या चार तासात अटक केली. आरोपींना अटक केली असली तरी परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
शाहरुख शाहनवाज शेख (वय २९, रा. गुलाबनगर, दापोडी), मोहम्मद शोएब नौसार अलवी (वय २६, रा. पवार वस्ती, दापोडी), फारुख शाहनवाज शेख (रा. गुलाबनगर, दापोडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजता आरोपी पिंपरी-चिंचवड लिंकरोडवरील पत्रा शेड येथे रिक्षातून आले. पत्रा शेड येथे आतील बाजूस जाऊन आरोपींनी एका दुकानदाराला सीसीटीव्ही कॅमेरे बंद करण्याची धमकी दिली. मद्यधुंद असलेल्या आरोपींनी नागरिकांकडे बंदूक रोखून नंतर अंधाधुंदपणे गोळीबार केला. पत्रा शेड येथे चार गोळ्या झाडल्या. त्यानंतर आरोपी भाटनगर येथे गेले. तिथे त्यांनी दोन गोळ्या हवेत झाडल्या. तिथून आरोपी बौध्दनगर येथे गेले आणि तिथे त्यांनी एक गोळी हवेत झाडली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे, पोलीस उपायुक्त विवेक पाटील, स्वप्ना गोरे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पाच पथके आरोपींच्या मागावर पाठवण्यात आली. पोलिसांनी चार तासात तीन आरोपींना अटक केली आहे.
पूर्वीच्या गुन्ह्यात नाव घेतले म्हणून केला गोळीबार
शाहरुख शेख याचा भाऊ इरफान शेख याचे पूर्वी दाखल असलेल्या गुन्ह्यात साक्षीदाराने नाव घेतले होते. त्या रागातून त्याने हा गोळीबार केला. परिसरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी आरोपी सोमवारी रात्री देखील पत्रा शेड परिसरात येऊन गेले होते. मंगळवारी पुन्हा मद्यधुंद अवस्थेत येऊन त्यांनी गोळीबार केला.
साहेब, आम्ही दहशतीत जगतोय
दिवाळीच्या फटाक्यांप्रमाणे गोळीबाराचे आवाज आले. सुरुवातीला कुणीतरी फटाके फोडत असल्यासारखे वाटले. मात्र नागरिक आणि मुलांची धावपळ उडाल्यानंतर घटनेचे गांभीर्य लक्षात आले असल्याचे प्रत्यक्षदर्शी महिलेने सांगितले. माझी मुलगी आरोपींच्या रिक्षाजवळ खेळत होती. मी धावत जाऊन तिला कुशीत घेतले. या प्रकरणात मुलगी प्रचंड घाबरली होती. बराच वेळ ती एकसारखी रडत होती. साहेब, आम्ही दहशतीत जगतोय. त्यांचे ज्यांच्याशी वैर आहे, त्यांना भांडावे. आम्ही दहशतीत का जगायचं, असा सवाल त्या महिलेने उपस्थित केला.
लहान मुलांनी पुंगळ्या जमा केल्या
आरोपी पत्राशेड येथे गोळीबार करून पळून गेले. काही वेळेनंतर तिथे खेळणाऱ्या लहान मुलांनी काडतुसांच्या पुंगळ्या खेळण्यासाठी गोळा करून आणल्या. त्या काडतुसांच्या पुंगळ्या असल्याचे लक्षात आल्याने नागरिकांनी मुलांना आवरले.
स्मार्ट सिटीचे सीसीटीव्ही बंद
आरोपींनी भाटनगर येथील एका चौकात गोळीबार केला. त्याच चौकात स्मार्ट सिटी अंतर्गत कॅमेरे बसविण्यात आले आहेत. पोलिसांनी त्या कॅमेऱ्यांची फुटेज काढण्याचा प्रयत्न केला असता ते कॅमेरे बंद अवस्थेत असल्याचे उघडकीस आले. भर वस्तीतील चौकात लावलेल्या कॅमेऱ्यांची अशी अवस्था असेल तर शहरातील इतर भागातील कॅमेऱ्यांच्या अवस्थेचा विचार न केलेलाच बरा.