नवी दिल्ली : प्रेमासाठी वाट्टेल ते करण्यासाठी प्रेमी युगुल तयार असतात. प्रेमात आकंठ बुडालेल्या एका प्रेयसीने आपल्या प्रियकरासाठी स्वतःच्या आयुष्याची बाजी लावली असल्याचे समोर आले आहे. HIV ग्रस्त प्रियकराच्या प्रेमात एक अल्पवयीन मुलगी इतकी वेडी झाली की तिने चक्क आपल्या एचआयव्ही पॉझिटिव्ह प्रियकराचे रक्त इंजेक्शनमार्फत स्वतःच स्वतःच्या शरीरात टोचून घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
जगात आपल्याला कोणीही दूर करू शकत नाही असे म्हणत तिने हे कृत्य केल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर मुलाला अटक करण्यात आली आहे. तर मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ती डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे. आसामच्या सुआलकुचीमध्ये ही घटना घडली. येथे राहणारी मुलगी अवघ्या 15 वर्षांची आहे. फेसबुकमार्फत तिची हाजोच्या सतडोलामध्ये राहणाऱ्या एका मुलाशी मैत्री झाली. त्यांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. गेल्या तीन वर्षांपासून त्यांचे प्रेमप्रकरण सुरू आहे. यादरम्यान मुलीला तिचा प्रियकर एचआयव्ही पॉझिटिव्ह आसल्याचे समजले.
मुलीच्या प्रेमप्रकरणाबाबत आणि मुलगी ज्याच्यावर प्रेम करते तो एचआयव्ही पॉझिटिव्ह आहे याची माहिती तिच्या कुटुंबापर्यंत पोहोचली. त्यानंतर तिच्या घरच्यांनी त्यांच्या प्रेमाला विरोध केला. त्यांनी तिला त्याला न भेटण्याची सक्त ताकीद दिली. तरी मुलगी बऱ्याचवेळा प्रियकराला भेटली. पळून जाण्याचाही प्रयत्न केला. पण जितक्या वेळा ती त्याला भेटली तितक्या वेळा तिचे पालक तिला स्वतः जाऊन परत घेऊन आले. मुलीने यानंतर भयंकर पाऊल उचलले.
आपल्या प्रियकराला एचआयव्ही असल्याची माहिती होती. त्यामुळे तिने त्याच्या शरीरातून इंजेक्शनमार्फत रक्त काढले आणि ते आपल्या शरीरात इंजेक्ट केले. जेणेकरून कोणीच त्या दोघांना वेगळे करू शकणार नाही. मुलीने जे केले ते समजताच सर्वजण हादरले. तिच्या कुटुंबाने याची पोलिसांना माहिती दिली. दरम्यान, पोलिसांनी त्या मुलाला अटक केली आहे. तर मुलीला डॉक्टरांच्या देखरेखीत ठेवले आहे.