-कासारवाडी, फुगेवाडी, दापोडी, पिंपळे गुरव परिसरात पूरस्थिती
-झोपडपट्टीधारकांचे
-संसार पाण्यात
-शहरात वाहतूक कोंडी
-ठिकठिकाणी बचावकार्य
-थेरगाव पुलाला टेकले पाणी
-रहाटणी, थेरगाव, परिसरातही शिरले पाणी
-“एसटी’चा कोकणशी संपर्क तुटला
-सात हजार नागरिकांचे स्थलांतर
पिंपरी – मुसळधार पावसामुळे पवना धरणातून सलग तिसऱ्या दिवशी पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरात सलग दुसऱ्या दिवशी सोमवारी (दि. 5) पुराच्या पाण्याने थैमान घातले.
मागील दोन दिवसात सुमारे सात हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे. थेरगाव येथील पवना नदीवरील पूल, मुळा नदीवरील सांगवीतून स्पायसर कॉलेजकडे जाणारा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. दापोडी, सांगवी, पिंपळे गुरव, चिंचवडगाव, वाकड या भागांना पुराचा मोठा फटका बसला आहे. तसेच पिंपरी-चिंचवडचा औंध मार्गे पुण्याचा संपर्क तुटला आहे.
पवना धरण क्षेत्रात सोमवारी दिवसभरात सायंकाळी सहा वाजेपर्यंत 154 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. धरण क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्याने सकाळी सहा वाजल्यापासून 2460 क्युसेकवरून विसर्ग कमी करून 18 हजार 434 करण्यात आला. त्यामुळे शहरवासियांना काहीसा दिलासा मिळाला असताना दुपारी बारानंतर पावसाचा जोर वाढला. धरण क्षेत्रासह शहर व उपनगराला पावसाने झोडपून काढले. काल दिवसभरात नदीपात्रालगतच्या भागाला पुराचा फटका बसला होता. परंतु, आज लगतच्या नागरी वस्तीतही पाणी शिरले.
थेरगाव येथील बिर्ला रुग्णालयासमोरील पुुलाला टेकून पाणी वाहू लागले होते. मात्र, वाहतूक सुरळीत सुरू होती. हॅरीस पुलावरुनही पाणी वाहू लागल्याने या मार्गावर संथगतीने वाहतूक सुरू होती. अंतर्गत रस्ते वाहतुकीसाठी बंद झाल्याने मुख्य रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या. पंधरा मिनिटांच्या प्रवासासाठी तासन्तास वाहतूक कोंडीमध्ये अडकून पडण्याची वेळ चाकरमान्यांवर आली. फुगेवाडी येथे नाला तुंबून पुणे-मुंबई महामार्गावर पाणी आले. आई माता मंदिर परिसरातील नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले.
शेकडो झोपड्या पाण्याखाली
पिंपरी येथील सुभाषनगर (वाल्मिकीनगर), बौद्धनगर, संजय गांधीनगर, आंबेडकरनगर, जुनी मस्जिद भाग आदी ठिकाणी पवना नदीच्या पुराचे पाणी शिरले होते. त्यामुळे येथील शेकडो झोपड्या पाण्याखाली गेल्या. येथील नागरिकांना महापालिकेची कमला नेहरू शाळा, आर्य समाज विद्या मंदीर, वाल्मिकी आश्रम, संत हरिदास मंदीर, गुरूनानक मंदीर, शर्मा धर्मशाळा आदी ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले. परिसरातील नागरिकांचे सामान पुरामध्ये वाहून गेले. रविवारी मध्यरात्रीपासून संबंधित परिसरात नदीचे पाणी वाढण्यास सुरवात झाली. महापालिका प्रशासनाकडून अपेक्षित मदत मिळत नसल्याची तक्रार येथील नागरिकांनी केली. कित्येक झोपडवासियांचे संसार या पुराच्या पाण्यात उद्धवस्त झाले.
दोन्ही मार्गावर वाहतूक कोंडी
सांगवी परिसरातील मुळा नदीवरील जुना औंध पूल, राजीव गांधी पूल, स्पायर कॉलेज रोडवरील पूल हे तीन पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. कोणत्याही पुलावर पाणी आले नसले तरी पुलाच्या आजूबाजूला पाणी साचल्याने पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. हे तीनही मुख्य पूल बंद केल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. यामुळे देहुरोड-कात्रज बाह्यवळण मार्ग आणि जुना पुणे-मुंबई मार्ग या दोन्ही मार्गावर संपूर्ण वाहतुकीचा ताण आला होता. जुना पुणे-मुंबई महामार्गावर दापोडी येथील हॅरिस ब्रिजपासून कासारवाडीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. कासारवाडी आणि फुगेवाडी येथे पाणी आल्याने परिसरातील वाहतूक अतिशय धिम्या गतीने सुरू आहे.
कोकणच्या एसटी रद्द
गेल्या आठ दिवसांपासून पुणे, मुंबई, व पश्चिम महाराष्ट्रातील अन्य भागात सुरू असलेल्या संततधार पावसाचा फटका राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर झाला आहे. पिंपरी-चिंचवड येथील राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) 13 बसेसच्या फेऱ्या सोमवारी रद्द करण्यात आल्या आहेत. त्यापैकी कोकणच्या जवळपास सर्वच बसेसच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर, पूरसदृश्य स्थिती असलेल्या इतर ठिकाणच्या फेऱ्या सुद्धा रद्द करण्याचा निर्णय पिंपरी-चिंचवड आगार प्रशासनाने घेतला आहे. सध्या राज्यभरात सुरू असलेल्या पावसाचा फटका राज्य परिवहन महामंडळालाही बसला असल्याचे दिसून येत आहे. तसेच प्रवाशांची देखील तारांबळ होत आहे.
पुणे-मुंबई सर्व एक्सप्रेस रद्द
पुणे-मुंबई दरम्यान चालणाऱ्या रेल्वेच्या सर्व एक्सप्रेस पावसामुळे रद्द करण्यात आल्या. यामुळे प्रवाशांची मोठी तारांबळ झाली होती. इंटरसिटी, प्रगती, सिंहगड, डेक्कन क्वीन, इंद्रायणी या पुणे-मुंबई दरम्यान रोज धावणाऱ्या रेल्वे रद्द झाल्याने प्रवाशांना खासगी बस आणि इतर वाहनांनी प्रवास करावा लागला. एक्सप्रेस रद्द झाल्या असल्या तरी पुणे आणि लोणावळा दरम्यान धावणाऱ्या सर्व 42 लोकल सुरळीत सुरू असल्याने पिंपरी-चिंचवडकरांना मोठा दिलासा मिळाला होता. परंतु मुंबईला रोज अप-डाऊन करणाऱ्या चाकरमाने आणि व्यावसायिकांना मात्र खासगी वाहने शोधावी लागली. यामुळे चिंचवड परिसरात खासगी वाहतूक करणाऱ्या वाहनचालंकाची चांदी झाली. त्यांनी तिपटीने भाडे वाढवून प्रवाशांना लुबाडले.
बचाव पथकाची धावपळ
नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविताना बचाव पथकांची अक्षरशः धावपळ झाली आहे. महापालिकेच्या सुमारे दीड हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांसह एनडीआरएफ व पोलीस कर्मचारी बचाव कार्यासाठी चौवीस तास तैनात आहेत. महापालिकेच्या लिपिकांपासून ते इंजिनिअरपर्यंत सगळ्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. महापालिकेच्या सहा बोटींसह, एनडीआरएफची एक बोट तसेच पूरात अडकलेली वाहने बाहेर काढण्यासाठी दोन देवदूत वाहनांचा वापर नागरिकांच्या बचाव कार्यासाठी करण्यात येत आहे.
दिवसभरात चार हजार नागरिकांचे स्थलांतर
बचाव कार्यात दिवसभरात सुमारे चार हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे. कालपासून स्थलांतरित करण्यात आलेल्या नागरिकांची संख्या सात हजारांवर पोहचली आहे. दापोडी परिसराला पुराचा मोठा फटका बसला आहे. पवार वस्ती, दापोडी गावठाण, बॉम्बे कॉलनी पूर्णतः जलमय झाली आहे. बोपखेलमधील सुमारे दोनशे नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले. सांगवीतील मधुबन सोसायटी, मुळानगर मधील साडेसातशे नागरिकांचे आज स्थलांतरण करण्यात आले. महापालिकेच्या कासारवाडी येथील आयटीआयपर्यंत पवनेचे पाणी शिरले आहे. वाकडमधील कस्पटेवस्तीत पाणी शिरले असून शिक्षक कॉलनी पूर्ण पाण्यात गेली आहे. रहाटणी येथील सहाशे तर वाल्हेकरवाडीतील 50 कुटुंबांचे स्थलांतरण करण्यात आले आहे. एनडीआरएफच्या मदतीने दापोडीतील आठ जणांना बोटीच्या सहाय्याने सुखरुप बाहेर काढण्यात आले, अशी माहिती महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर
यांनी दिली.
रहाटणी जलमय
सलग दुसऱ्या दिवशीही शहरात पूरसदृश्य परिस्थिती होती. रविवारच्या तुलनेत सोमवार परिस्थिती जास्तच भयावह झाली होती. रहाटणी गावठाण परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने कित्येक कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावे लागले. सोमवारी सायंकाळच्या सुमारास जवळपास दोन ते तीन हजार नागरिक पाण्यात अडकले होते. सुमारे 400 ते 500 जणांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी काही ठिकाणी बोटींचाही वापर करण्यात आला. या पुरामुळे रहाटणी परिसरातील नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
चिंचवडमध्ये सर्वत्र पाणीच पाणी
चिंचवड येथील महासाधू मोरया गोसावी मंदिर पाण्याखाली गेले होते. मोरया गोसावी मंदिराकडून थेरगावला जाणाऱ्या रस्त्यावर असलेला दशक्रिया घाट पाण्याखाली गेला होता. तसेच, येथील रस्त्यावर देखील पाणी आले होते. त्यामुळे येथून जाणारा रस्ता बॅरिकेट्स लाऊन वाहनांसाठी बंद करण्यात आला होता. पर्यायाने, नागरिकांना चिंचवड येथील मंगलमूर्ती वाडा, धनेश्वर मंदिरमार्गे थेरगावला जावे लागत होते.
शहरात वाहतूक कोंडी
चिंचवड थेरगाव येथील पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. चिंचवड, रावेत, वाल्हेकरवाडी आणि परिसरातून वाकड, हिंजवडीकडे जाणाऱ्या मार्गावर आदित्य बिर्ला रुग्णालयाजवळ पवना नदीवर पूल आहे. सोमवारी नदीचे पाणी थेरगाव पुलापर्यंत आले. मंगळवारी (दि. 6) दुपारनंतर पुलावरून पाणी वाहू लागले. तरीही पुलावरून संथ गतीने वाहतूक सुरु होती. सायंकाळी सहाच्या सुमारास पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागले. त्यामुळे पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली. यामुळे वाकड, काळेवाडी भागात जाण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे. या मार्गावरून जाणा-यांना मोठा वळसा घालून जावा लागणार आहे.
पिंपळे गुरव येथे झाड पडले
पिंपळे गुरवमधील लक्ष्मीनगर येथे रस्त्यावर एक झाड कोसळले. या घटनेत कोणतीही हानी झाली नाही. गुरव पिंपळे परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले असल्याने पोलिसांकडून रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. वाहतुकीसाठी बंद असलेल्या रस्त्यावर झाडपडीची घटना घडली. यामुळे कोणालाही इजा झाली नाही.
आज “हाफ डे’
दरम्यान हिंजवडी, वाकड आणि सांगवी भागातील काही आयटी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना सुट्टी दिली. तर काही कंपन्यांनी कामावर आलेल्या कर्मचाऱ्यांना हाफ डे सुट्टी देत घरी पाठविले. तसेच उद्योगनगरीमधील अनेक कंपन्यांनी आपले कर्मचारी सुरक्षित घरी पोहचावे, यासाठी त्यांनी लवकर घरी सोडले.
फुगेवाडीतील भुयारी मार्ग “पाण्यात’
पावसाळी पाणी निचरा व्यवस्थेतील त्रुटीमुळे फुगेवाडीतील भुयारी मार्ग “पाण्यात’ गेला आहे. रस्ताच्या दोन्ही बाजूला जोडणारा हा मार्ग आहे. पाण्यामुळे तो बंद करण्याची वेळ आली आहे. हा मार्ग बंद असल्याने नागरिकांसह शाळकरी मुलांना जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडावा लागत आहे.
पुढील काही तास अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी गरजेनुसार घराबाहेर पडावे. पाण्याच्या ठिकाणी सेल्फी काढण्याचा मोह टाळावा. महापालिकेची यंत्रणा बचाव कार्यासाठी सज्ज आहे.
– श्रावण हर्डीकर, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका.