मुंबई – साऊथचा सुपरस्टार थलपथी विजय त्याच्या दमदार अभिनयासाठी ओळखला जातो. विजयचे चाहते त्याच्या चित्रपटांची प्रतीक्षा करत असतात. गेल्या अनेक दिवसांपासून विजय त्याच्या आगामी चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. चित्रपटासाठी अधिक मानधन घेतला जाणारा अभिनेता म्हणून त्याची चर्चा होत असते. यावरूनच आता पुन्हा एकदा तो चर्चेत आला आहे.
तो भारतातील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता बनला आहे. तो त्याच्या आगामी चित्रपटासाठी 200 कोटी रुपये मानधन घेणार असल्याचे सांगितले जात आहे. थलपथी विजयने त्याच्या पुढील चित्रपटासाठी दक्षिण उद्योगातील लोकप्रिय दिग्दर्शक व्यंकट प्रभू यांच्याशी हातमिळवणी केली आहे. ही रक्कम एजीएस एंटरटेनमेंटकडून थलपथी विजयला दिली जाणार असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र याबाबत थलपथी विजय, निर्माते यांच्याकडून कोणतेही वक्तव्य करण्यात आलेले नाही.
थलपथी विजयच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ‘वारीसू’ चित्रपटानंतर थलपथी विजय दिग्दर्शक लोकेश कनागराज यांच्या ‘लिओ’ नावाच्या आगामी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचं शूटिंग सध्या सुरु आहे. या चित्रपटात विजय व्यतिरिक्त बॉलिवूड अभिनेता संजय दत्त देखील दिसणार आहे.
या चित्रपटात संजय दत्तची व्यक्तिरेखा खलनायकाची असणार असल्याचे मानले जात आहे. या दोन स्टार्सशिवाय प्रिया आनंद, तृष्णा कृष्णन आणि अर्जुन सर्जा हे देखील चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.थलपथी विजय आणि त्रिशा कृष्णन १४ वर्षांनंतर एकत्र दिसणार आहेत.