– कर्नाटक विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं. यानंतर आज (शनिवार) बंगळुरू येथील कांतिरावा मैदानात मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी सोहळा पार पडत आहे. मुख्यमंत्रीपदावर सिद्धरमय्या तर उपमुख्यमंत्रीपदावर डी के शिवकुमार विराजमान होतील यावर याआधीच शिक्कामोर्तब झाले होते. याप्रमाणे दोघांचाही शपथविधी पार पडला.
कर्नाटक विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपची झालेली पीछेहाट लोकसभा निवडणुकांमध्ये विरोधकांच्या पथ्थ्यावर पडू शकते असे कयास बांधण्यात येत आहेत. त्यामुळे, कर्नाटकच्या शपथविधी सोहळ्याच्या निमित्ताने विरोधक एकजुटीचे दर्शन घडवतील असे अंदाज लावण्यात आले होते. मात्र या सोहळ्याला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची उपस्थिती लाभली नाही.
राहुल गांधी, प्रियांका गांधींची उपस्थिती
शपथविधी सोहळ्याला राहुल गांधी प्रियांका गांधी तसेच काँग्रेसचे अन्य वरिष्ठ नेते उपस्थित होते. राहुल व प्रियांका यांना विमानतळावरून शपथविधी सोहळ्याच्या स्थळापर्यंत आणण्यासाठी डी के शिवकुमार गेले होते.