दिग्गजांचे उमेदवारी अर्ज दाखल
मुंबई : राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचे आदित्य ठाकरे, भाजपचे चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांनी गुरुवारी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस उद्या (शुक्रवार) आहे. त्यामुळे आज बहुतेक दिग्गज नेत्यांनी शक्तीप्रदर्शन करत उमेदवारीचे अर्ज दाखल केले.
निवडणुकीच्या राजकारणात उतरणारे ठाकरे कुटुंबातील पहिले सदस्य ठरलेले आदित्य हे वरळी विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवत आहेत. उमेदवारी अर्ज भरताना त्यांच्यासोबत त्यांचे वडील आणि शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि आई रश्मी या देखील होत्या.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्याच्या कोथरूड मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्यासमवेत पक्षाचे पुण्याचे खासदार गिरीश बापट आणि कोथरूडच्या आमदार मेधा कुलकर्णी उपस्थित होते. चंद्रकांत पाटील यांच्यासाठी मेधा कुलकर्णी यांना यावेळी तिकीट नाकारण्यात आले आहे. ठाण्याचे कळवा-मुंब्रा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपला अर्ज दाखल केला. यावेळी पक्षाध्यक्ष शरद पवार त्यांच्यासमवेत होते. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी बीडच्या परळी मतदार संघात चुलत भगिनी आणि भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे यांच्याविरोधात उमेदवारी अर्ज दाखल केला. स्थानिक कॉंग्रेस आणि डाव्या नेत्यांसमवेत धनंजय यांनी उमेदवारी दाखल केला. त्यापूर्वी त्यांचे काका, दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांना आदरांजली वाहिली.
लातूरमध्ये कॉंग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी लातूर (शहर) जागेवर उमेदवारीचा अर्ज दाखल केला. त्यांचे धाकटे बंधू धीरज देशमुख यांनी लातूर (ग्रामीण) मतदारसंघातून उमेदवारी अर्ज सादर केला. दोघांसोबत त्यांचे बंधू आणि बॉलिवूड अभिनेते रितेश आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांसह कुटुंबातील सदस्यही होते.