नाशिक : नाशिक शहरातमागील काही दिवसांपासून गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असल्याचे दिसत आहे. त्यातच आता पुन्हा एकदा इथे अशीच घटना घडली आहे ज्यामुळे परिसरातील वातावरणात तणाव निर्माण झाले आहे. देवळाली गाव परिसरात शिंदे गट आणि ठाकरे गटात शाब्दिक चकमक होऊन शिंदे गटाचे पदाधिकारी सूर्यकांत लवटे यांच्या मुलाने थेट बंदूक काढत हवेत गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
शिवजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या देवळाली गाव परिसरातील मंदिरात सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षपदावरुन चर्चा सुरु असतानाच शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या समर्थकांमध्ये वाद झाले. यावेळी स्वप्निल सूर्यकांत लवटे याने हवेत गोळीबार केला. गोळीबाराचा आवाज येताच परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, भीतीपोटी व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद केली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान, हवेत गोळीबार केल्याचे समजताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह मोठा फौजफाटा इथे तैनात करण्यात आला होता. दरम्यान पोलिसांनी संशयित स्वप्निल लवटेला ताब्यात घेतले असून उपनगर पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वप्निल लवटे हा शिंदे गटाचे नाशिक जिल्हा सहसंपर्क प्रमुख राजू लवटे यांचा पुतण्या देखील आहे.
महत्त्वाचे म्हणजे गेल्याच महिन्यात माजी नगरसेवक सूर्यकांत लवटे यांच्यासह नाशिकमधील अनेक माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. संजय राऊत नाशिक दौऱ्यावरुन परत येताच या नेत्यांनी शिंदे गटाची वाट धरली. संजय राऊत यांनी पंधरा दिवसांच्या अंतरावर दोन वेळा नाशिक दौरा करुनही पदाधिकारी आणि नगरसेवकांना रोखण्यात यश आलेले नाही. संजय राऊत माघारी फिरत असताना ठाकरे गटाला हे खिंडार पडल्याने याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होती.