एकही झाड न तोडता ठाकरे स्मारक ; अमृता फडणवीस यांना सेनेकडून प्रत्युत्तर

औरंगाबाद – माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी शिवसेनेवर ट्‌वीट करत निशाणा साधला. शिवसेना ही ढोंगी आहे. आपल्या सोयीप्रमाणे ते झाडांच्या कत्तलीसाठी विरोध करतात, असे ट्‌वीट करत अमृता फडणवीस यांनी शिवसेनेवर आरोप केले होते. यावर शिवसेनेने चोख प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

याबाबत औरंगाबादचे महापौर नंदकुमार घोडेले म्हणाले, शहरातील एमजीएम विद्यापीठाशेजारी प्रियदर्शनी उद्यानात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक होणार आहे. हे स्मारक 17 एकर जागेवर होणार आहे. त्यासाठी 64 कोटींची निविदा प्रक्रिया विचाराधीन आहे. शासनाकडून 5 कोटी रुपये मिळाले आहेत. निधी उपलब्ध करून देण्याचे शासनाने आश्वासित केले आहे. हे स्मारक करण्यासाठी तत्कालीन सरकारने हे मंजूरी दिली होती.

सध्या एक विषय चर्चेत आहेत. लावण्यात आलेली झाडे तोडून स्मारक बनवणार आहोत, असे बोलले जात आहे. महापौर म्हणून मी खुलासा करतो की, एकही झाड न तोडता स्मारक उभारण्यास आम्ही प्रयत्नशील आहोत. उद्धव ठाकरे यांनी जागेची पाहणी करताना झाडे न तोडता स्मारक व्हावे, असे आदेश दिले होते. उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणेच आमचाही झाडे तोडण्याला विरोध आहे, असे घोडेले म्हणाले.

तसेच अमृता फडणवीस यांनी केलेल्या ट्‌वीटमध्ये काही तथ्य नाही. आम्ही कोणतेही झाड कापणार नाही, असे शिवसेनेच्या प्रवक्‍त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी स्पष्ट केले. दरम्यान, औरंगाबाद येथे दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी झाडे कापण्यात येणार आहेत, अशा आशयाचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताचा फोटो शेअर कतर अमृता फडणवीस यांनी ट्‌वीट करून शिवसेनेवर निशाणा साधला होतो.

Leave A Reply

Your email address will not be published.