मुंबई : निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या दोन्ही गटांना नवी नावे आणि चिन्हं बहाल केली. त्यावरून सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा आणि मिम्सचा अक्षरश: पाऊस पडत आहे. त्याचा ट्रेंड पाहता सोशल मीडियावर ठाकरे गटाची चलती असल्याचे आणि शिंदे गटाला प्रतिकूल प्रतिसाद असल्याचे आढळते. ठाकरे गटाला सहानुभूती, की खरोखरीच वाढता पाठिंबा ते पुढील काळात दिसून येईल.
तर दुसरीकडे ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाचा निषेध करण्यात आलाय. मुंबईच्या काळाचौकी भागातील ठाकरे गटाच्या शाखेसमोर हा निषेधाचा बोर्ड लावण्यात आला आहे.
वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या बोर्डवर निवडणूक आयोग आणि शिंदे गटाच्या विरोधात घोषणा लिहिण्यात आल्या आहेत. 40 गद्दार, मिंधेगट म्हणत निषेध करण्यात आला आहे. कळसुत्री बाहुली, भाजपचं गोड टरबुज, कणकवलीची गावठी कोंबडी चोर यांचा घवघवीत निषेध असं यावर लिहिण्यात आले आहे.