नवीदिल्ली – आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त भाजपच्या आमदाराचे वादग्रस्त विधान समोर आलं आहे. यावेळी आमदाराने थेट देवी देवतांवर वादग्रस्त टिपण्णी केली आहे. उत्तराखंडमधील भाजप आमदार बंशीधर भगत यांनी विद्यार्थ्यांना यशाचा मंत्र म्हणून अजब सल्ला दिलाय. चांगला अभ्यास करायचा असेल तर सरस्वतीला पटवा.
हल्द्वानी येथे आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात माजी कॅबिनेट मंत्री बंशीधर भगत विद्यार्थ्यांना म्हणाले, ‘देवानेही तुमची बाजू घेतली आहे. विद्या मागायची असल्यास सरस्वतीला पटवा, बळ हवं असल्यास दुर्गाला पटवा, धन हवं असल्यास लक्ष्मीला पटवा. माणसाकडे काय आहे, एक शिव आहे, तो डोंगरात पडून आहे. एक विष्णु देवता आहे, जो समुद्राच्या खोलात आहे.महिला सक्षमीकरण हे देवाने आधीच केले आहे.अशी विधान भाजप आमदाराने केली आहेत.
कोण आहेत बंशीधर भगत
सामान्य कुटुंबात जन्मलेल्या बंशीधर भगत यांनी देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रेरणेने राजकारणात पाऊल ठेवले होते. भगत यांनी 1975 मध्ये जनसंघ पक्षात प्रवेश केला. त्यानंतर अनेक जिल्ह्यांच्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या. 1991 मध्ये ते पहिल्यांदा नैनितालमधून आमदार म्हणून निवडून आले आणि त्यांनी उत्तर प्रदेश विधानसभेचा उंबरठा ओलांडला. 1993 मध्ये ते दुसऱ्यांदा आणि 1996 मध्ये तिसऱ्यांदा नैनितालमधून आमदार म्हणून निवडून आले. ते अविभाजित यूपीमध्ये मंत्रीही राहिले आहेत.