अलिबाग – रत्नागिरीतील राजापूरचे ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांची आज पुन्हा एसीबी चौकशी करण्यात आली आहे. आमदार साळवी यांची कुटुंबासह शुक्रवारी अलिबाग येथील एसीबी कार्यालयात 6 तास चौकशी करण्यात आली. ही चौकशी उद्या, बुधवारीही सुरू राहणार आहे.
बेनामी मालमत्ता जमवल्याप्रकरणी आमदार साळवी यांची मागील काही महिन्यांपासून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी सुरू आहे. आतापर्यंत साळवी हे चार वेळा चौकशीसाठी हजर राहिले होते. त्यांचे स्वीय सहायक मालप यांचीदेखील चौकशी करण्यात आली.
एसीबीकडून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहकार्याने साळवी यांचे राहते घर आणि रत्नागिरीतील हॉटेलचे मूल्यांकन करण्यात आले. एसीबीने साळवी यांच्यासह त्यांच्या कुटुंबालाही चौकशीसाठी पाचारण केले.
मध्यंतरीच्या काळात एसीबी कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांमुळे ही चौकशी लांबली होती. मंगळवारपासून ती पुन्हा सुरू झाली आहे. आमदार राजन साळवी, त्यांच्या पत्नी अनुजा, दोन मुले शुभम आणि अथर्व, भाऊ दीपक साळवी, त्यांचे सीए श्रीरंग वैद्य मंगळवारी सकाळी 11 वाजता चौकशीसाठी अलिबाग येथील एसीबी कार्यालयात पोहोचले. त्यानंतर साधारण सहा तास त्यांची चौकशी सुरू होती.