नवी दिल्ली: करोनाची चाचणी करण्यासाठी तपासणी किट अत्यल्प दरात उपलब्ध करून द्यावे असे निर्देश दिल्ली उच्च न्यायालयाने दिले आहेत. रेअर मेटाबॉलिक्स आणि आर्क फार्मासोटिकल्स या कंपन्यांनी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान हायकोर्टाने हे निर्देश दिले.
हे कीट ज्या कंपनीकडून आयात केले जातात त्या मॅट्रीक्स कंपनीकडून 7.24 लाख कीट मागवण्यात यावेत, अशी मागणी या याचिकेमध्ये करण्यात आली आहे. ही कीट भारतात उपलब्ध केल्यानंतर त्याचे वितरण करण्याची जबाबदारी रेअर आणि आर्क या दोन कंपन्यांकडे सोपवली गेलेली होती. या तिन्ही कंपन्यांनी 10 लाख कीट चीनमधून आयात करावीत आणि देशभरात 400 रुपये प्रति कीट याप्रमाणे देशभरात उपलब्ध करून द्यावीत, असे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत.
देशातली विविध राज्य सरकारे आणि खाजगी प्रयोगशाळांनी सुमारे 5 लाख 79 हजार 957 करोनाच्या चाचण्या केल्या असल्याची माहिती “आयसीएमआर’ अर्थात भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं दिली आहे.
“आयसीएमआर’ने देशातल्या सरकारी आणि खाजगी प्रयोगशाळांना “कोविड -19′ च्या चाचणी सुविधा द्यायचे काम सुरू ठेवले असून आतापर्यंत 272 सरकारी प्रयोगशाळा आणि 87 खासगी प्रयोगशाळांना “कोविड -19′ च्या चाचण्या करायला मान्यता दिली आहे.