श्रीनगर – जम्मू आणि काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचा एक अड्डा उद्ध्वस्त केला असून मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे, दारुगोळा आणि सॅटेलाईट फोनसह अन्य दहशतवादी साहित्याचा साठाही हस्तगत केला आहे, असे पोलिसांनी सांगितले. उत्तर काश्मीरमधील सोपोरमधील राफियाबाद येथे हा दहशतवादी अड्डा होता, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
32 राष्ट्रीय रायफल्स, रफियाबाद विशेष कृती दल आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या 92 बटालियनच्या संयुक्त पथकाने केलेल्या शोधमोहिमेदरम्यान हा अड्डा शोधून काढण्यात आला. जप्त केलेल्या शस्त्रास्त्रांमध्ये एके-रायफली, 2000 एके राऊंड, 3 आरपीजी राऊंड, 2 वायरलेस सेत आणि सॅटेलाईट फोनचा समावेश आहे.
पोलिसांनी हे प्रकरण दाखल करून घेतले आहे. गुन्हेगारी कृत्यांसाठीचे हे साहित्य ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.