जीवनगाणे: गाऊ जीवन गाणे…

अरुण गोखले
जन्म कोणालाच चुकवता येत नाही आणि मरण हे कोणाकडे मागून मिळत नाही. या जन्म आणि मृत्यूच्या मधला ज्याचा त्याचा जो कालावधी ते ज्याचं त्याचं जीवन. प्रत्येकाचं जीवन आणि ते जगणं हे वेगवेगळं असतं. एकाच झाडावर उमललेली फुललेली दोन फुलं जशी सारखी नसावीत पण प्रत्येकात काही ना काही तरी विशेष अन्‌ वेगळे असते ना? तसंच आपल्या सर्वांचं जीवन असतं हे ज्याला त्याला मिळालेले जीवन किती मोठे आहे किंवा किती लांब आहे यापेक्षा ती व्यक्‍ती ते जीवन किती खऱ्याअर्थाने जगलीय ह्यावर त्याचं मोजमाप अवलंबून असतं.

मानवी आयुष्याला जीवन ही पाण्याची दिलेली उपमा किती गोड आहे. खरंच जीवन म्हणजेच पाणी हे स्वभावताच गोड असते. त्याच्या अंगी जगविण्याचा आणि फुलविण्याचा एक दैवी गुण असतो. पाणी हे सर्व जीवांची तहान भागविते. अमृताचे सिंचन करून त्याच्या संपर्कातील असंख्य जीवन फुलविते, वाढविते. अवघ्या सृष्टीच्या, निसर्गाच्या उत्पत्ती संवर्धनाचं गमक आहे पाणी. पाणी मलिनता दूर करते, ते बी रुजवते आणि फुलवतेही. पाण्याचे हेच सारे गुणधर्म लक्षात घेऊन आपणही आपल्या या जीवनरूपी बागेला फुलवीत न्यायला हवी.

आपल्या बरोबर आपण आपलं कुटुंब, मित्र परिवार, सगे सोयरे आणि सभोवतीची माणसे यांनाही हसवत फुलवत आणि जीवनगीत गात गात सोबत न्यायला हवे. पाणी जसे जीवाला त्याची ओढ, त्याची तहान लावते तसे आपणही आपल्या माणसांना आपल्या निःस्वार्थ प्रेमाची तहान लावली पाहिजे. पाण्यासारखंच जीवन हे अनमोल असल्याने आपण ते आपल्या जीवन बागेत खेळवायला हवं, त्याला नाना रंगांनी रंगवायला हवं. आनंदगीते गायला हवीत आणि आपलीच जीवनसरिता त्या परमेश्‍वराच्या अथांग प्रेमसागरात नेऊन मिळवायला हवी.

माणूस हा किती जगला ह्याला किंमत नसते तर तो जीवनाचा अर्थ समजावून घेत कसं जगला ह्याला मोल असते. फुलपाखरू किती कमी दिवस जगते पण त्या अल्पकाळातही ते इतरांना सुखावते. आपण जगत असताना आपल्या इवल्याशा का होईना पण आधाराने इतरांनाही जगविण्यात एक वेगळंच सुख आणि समाधान हे सामावलेलं असतं. जगत आणि जगवत जाणे हेच माणुसकीचे लक्षण आहे. त्यासाठी प्रत्येक क्षण हा नव्या आनंदाने, उत्साहाने एका स्वछंद मुशाफिरासारखे गाणे आपण गात गात प्रत्येक क्षण जगू या.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)