बीजिंग: चीनमध्ये करोनाचा विळखा रोजच घट्ट होत असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण याचे भयानक चित्र आता समोर येण्यास सुरुवात झाली आहे. चीनमध्ये एकाच दिवसात तब्बल 3.7 कोटी करोना रुग्णांची नोंद करण्यात आली असल्याची माहिती ब्लूमबर्गच्या अहवालातुन समोर आली आहे. ही रुग्णसंख्या जगभरातील आज पर्यंतची सर्वात मोठी संख्या असल्याचेही या अहवालात म्हटले गेले आहे.
चीनमध्ये आतापर्यंत 24.8 कोटी लोक करोनाबाधित असून ही संख्या देशाच्या एकूण लोकसंख्येच्या 18 टक्के इतकी आहे. विशेष म्हणजे डिसेंबरच्या पहिल्या 20 दिवसांमध्येच करोनाच्या एवढ्या मोठ्या रुग्णसंख्येची भर पडली आहे. बुधवारी झालेल्या चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाच्या अंतर्गत बैठकीत ही माहिती देण्यात आली असल्याची माहिती या अहवालात देण्यात आली आहे.
दरम्यान, चीनमध्ये करोनाच्या रुग्णसंख्येमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याने त्या ठिकाणी औषधांचा तुटवडा जाणवत आहे. चीनमध्ये आयबुप्रोफेन आणि पॅरासिटामॉलची सध्या जास्त मागणी आहे. तसेच देशातील रुग्णालयेही भरली जात असल्याची माहिती आहे. करोनासंबंधी अभ्यास करण्याऱ्या एका ब्रिटिश संस्थेने, एअरफिनिटीने त्याच्या अहवालात म्हटलं आहे की, चीनमध्ये दररोज 10 लाख रुग्णांची भर पडत असून पाच हजार रुग्णांना आपला जीव गमवावा लागत आहे.
मात्र वास्तविक परिस्थिती त्याहून भयानक असून हा आकडा मोठा असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या आधी जानेवारी महिन्यामध्ये चीनमध्ये दररोज सरासरी चार लाख रुग्णांची भर पडत होती. आताच्या रुग्णसंख्येने हा आकडा पार केला असून चीनमधील करोनाची स्थिती अत्यंत भीतीदायक असल्याचे म्हटले जात आहे.