पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने इयत्ता दहावी, बारावीच्या परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक मंगळवारी (दि. 21) राज्य मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
राज्यात पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूरम कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत दहावी, बारावीच्या परीक्षा एकाच वेळी घेण्यात येणार आहेत. बारावीची परीक्षा 4 मार्च ते 30 मार्च या कालावधीत होणार आहे. दहावीची परीक्षा 15 मार्च ते 4 एप्रिल या कालावधीत होणार आहे.
परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय यांच्याकडे छापील स्वरुपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असणार आहे. अन्य संकेतस्थळांवरील किंवा अन्य यंत्रणेचे छपाई केलेले तसेच व्हॉटसऍप किंवा तत्सम माध्यमातून प्रसारित झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये, असे राज्य मंडळाचे सचिव डॉ.अशोक भोसले यांनी स्पष्ट केले आहे.
प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा व अन्य विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी मंडळामार्फत शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना कळविण्यात येणार आहे, असे या सूचनेत म्हटले आहे.