पोंदेवाडीच्या ग्रामस्थांचा तहसील कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा
लाखणगाव – पोंदेवाडी (ता. आंबेव) येथे पिण्याच्या पाण्यासाठी असलेल्या पाझर तलावातील पाणी खडकवाडी येथील शेतकरी शेतीसाठी वापरत असल्याने पोंदेवाडी गावाला पिण्याच्या पाण्यासाठी टंचाई निर्माण झाली आहे. संबधित शेतकऱ्यांच्या कृषपंपाच्या मोटारी न काढल्यास पोंदेवाडीचे ग्रामस्थ बुधवार (दि. 22) पासून घोडेगाव येथील तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहेत, असा इशारा खरेदी-विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज यांनी दिला आहे.
तहसीलदारांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, खडकवाडीच्या अंदाजे 20 ते 25 शेतकऱ्यांनी अनधिकृतपणे पाझर तलावामध्ये मोटारी टाकल्या असून, हे शेतकरी पाण्याचा शेतीसाठी वापर करीत आहेत. गेल्या चार वर्षापासून पोंदेवाडी गावाला पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होत आहे. खडकवाडीच्या शेतकऱ्यांना पोंदेवाडी ग्रामपंचायतीने वारंवार लेखी सूचना दिल्या होत्या.
पाझर तलावात मुबलक पाणी शिल्लक असेल तर आपण शेतीसाठी पाणी उपसा करू शकता; पण तलावामध्ये अंदाजे तीन फुट पाणीसाठा शिल्लक ठेवा. जेणेकरून पोंदेवाडी गावाला पिण्यासाठी पाणी मिळू शकते; परंतू खडकवाडीचे शेतकरी ऐकत नाही. संपूर्ण पाण्याचा उपसा करतात. पोंदेवाडी हद्दीमध्ये गावालगत एक पाझर तलावालगत गावाला सार्वजनिक पाणी पुरवठा करणारी नवीन विहीर आहे.
पाझर तलावातून झिरपून आलेले पाणी विहिरीत साचवून सर्व वाडीवस्तीला पाणी पुरवठा केला जातो. प्रत्येक कॅनॉलच्या आवर्तनानंतर संबंधित कालव्यातून पाझर तलावात पाणी सोडले जाते आणि त्यातून संपूर्ण गावाला पिण्यासाठी पाणी पुरवठा केला जातो. प्रशासनाने मंगळवार (दि. 21) पर्यंत येथील मोटारी काढल्या नाहीत, तर पोंदेवाडीचे ग्रामस्थ बुधवार (दि. 22) पासून तहसील कार्यालयाबाहेर बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
पोंदेवाडीला तीन दिवसांनी एकदा पाणी
पोंदेवाडी गावामध्ये प्रत्येक वाडीवस्तीवर तीन दिवसांतून एकदा पाणी सोडावे लागत आहे. खडकवाडीच्या शेतकऱ्यांना जेव्हा डिंभा कालव्याला पाणी चालू असते, तेव्हा कॅनालवरून पाणी उचलण्याची परवानगी आहे.
संबधित शेतकरी कॅनालवरून पाणी न उचलता पाझर तलावातून पाणी उपसा करतात. तसेच जलसंपदा विभागाने खडकवाडीच्या शेतकऱ्यांना चारच महिने पाणी उचलण्याची परवानगी दिलेली आहे. हे शेतकरी हे बाराही महिने पाझर तलावातून पाणी उपसा करतात.