मुंबई : दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना क्रीडास्पर्धेतील सहभागाच्या आधारावर सवलतीचे गुण देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. कोविड-19 मुळे उद्भवलेल्या असामान्य परिस्थितीमुळे शालेय विद्यार्थ्यांचे नियमित शिक्षण बाधित होऊ नये यासाठी शालेय शिक्षण विभागाने विविध उपाययोजना केल्या आहेत.
करोनाचा प्रादूर्भाव कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा प्रचलित पद्धतीने घेण्यात येत आहेत. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षेस प्रविष्ट विद्यार्थ्यांच्या बाबतीत इयत्ता सातवी व इयत्ता आठवीमध्ये विद्यार्थ्यांचा क्रीडास्पर्धेतील सहभाग विचारात घेण्यात येऊन त्यांना सन 2021-22 या वर्षाकरिता सवलतीचे क्रीडा गुण देण्यात यावेत. तसेच इयत्ता बारावी परीक्षेस प्रविष्ट विद्यार्थ्यांच्या बाबतीत इयत्ता नववी व दहावीमधील विद्यार्थ्यांचा क्रीडा स्पर्धेतील सहभाग विचारात घेऊन सन 2021-22 करिता सवलतीचे क्रीडा गुण देण्यात यावेत, असे निर्देश राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिवांना देण्यात आल्याचे मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे. ही सवलत केवळ सन 2021-22 च्या परीक्षेकरिताच देण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.