Breaking News – मुंबईमधील सहा लोकसभा मतदारसंघापैकी काही मतदारसंघाचा तिढा गेले काही दिवस महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये दिसत होता. त्यापैकीच एक असलेल्या मुंबई उत्तर मध्य लोकसभेसाठी आता काँग्रेसने वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
या मतदारसंघात भाजपच्या विद्यमान खासदार पूनम महाजन सलग दोन वेळा निवडून आल्या होत्या. मात्र यावेळी त्यांच्या उमेदवारीबाबत भाजपकडून मौन बाळगण्यात आले आहे. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
मुंबई उत्तर मध्य मतदारसंघासाठी नसीम खान, भाई जगताप यांच्यासह इतर काही नावांची चर्चा होती. मात्र, अखेर वर्षा गायकवाड यांच्या मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातील उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.
खरंतर वर्षा गायकवाड दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासही इच्छुक होत्या. मात्र, त्यानंतर दक्षिण मध्य मुंबईसाठी अनिल देसाई यांच्या नावाची घोषणा झाल्याने वर्षा गायकवाड काहीशा नाराज होत्या.
दरम्यान, महायुतीने अद्याप या मतदारसंघातून उमेदवाराच्या नावाची घोषणा केलेली नाही. त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांच्या विरोधात महायुती आता कोणता उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार याकडे आता लक्ष लागले आहे.