यवतमाळ – यवतमाळ बाजार समिती संचालक आणि शिवसेनेचे पदाधिकारी सुनील डिवरे यांच्या काल झालेल्या हत्येनंतर शिवसैनिकांनी आणि गावकऱ्यांनी नागपूर-तुळजापूर मार्गावर आज दुपारी रास्ता रोको आंदोलन केले. तातडीने कारवाई करत आरोपींना अटक करण्याची मागणी केली.
यवतमाळ जिल्ह्यातील भांबराजा येथील एका शिवसेना पदाधिकाऱ्याची सुनील डिवरे यांची गुरुवारी रात्री आठच्या सुमारास घरात घुसूनन गोळ्या घालून आणि नंतर कुऱ्हाडीने वार करून हत्या करण्यात आली. पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. फरार आरोपींना पोलिसांनी तातडीने अटक करावी अशी मागणी आमदार संजय राठोड यांनी पोलिसांकडे केली. राठोड यांनी डिवरे यांच्या नातेवाईकांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केले.
या घटनेमुळे शिवसैनिक संतप्त झाले असून त्यांनी आज नागपूर-तुळजापूर मार्गावर रास्तारोको आंदोलन केलं. यावेळी काही ठिकाणी टायर जाळून काही वेळासाठी वाहतूक बंद करण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केला. या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. या आंदोलनामुळे या मार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली.