ठाणे – शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर अनेकदा ठाकरे समर्थक आणि शिंदे समर्थकांमध्ये वाद होताना पाहायला मिळत आहे. काल होळीच्या मुहूर्तावर ठाण्यात शिंदे समर्थक आणि ठाकरे समर्थकांमध्ये शाखेवरून राडा झाल्याचे समोर आले. यावरून दोन गट आमने सामने आल्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले. राज्यात पहिल्यांदाच एखाद्या पक्षाच्या स्थापनेनंतर त्या पक्षाची मालकी वेगळ्या व्यक्तीकडे गेल्याचे ऐतिहासिक चित्र पाहायला मिळाले. यामुळे शिवसेनेत ठाकरे गट आणि शिंदे गट अशी दोन केंद्रस्थान निर्माण झाल्याचे दिसून आले. यावरूनच आता ठाण्यातील शिवाईनगर येथे शिवसैनिकांमध्ये राडा झाल्याचे समोर आले आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांनी शिवाईनगर येथील शाखेवर जाऊन शाखेचे कुलूप तोडून शाखा ताब्यात घेतली. हा प्रकार समोर येताच ठाकरे गटाचे कार्यकर्ते त्या ठिकाणी पोहचले. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी पन्नास खोक्यांवरून घोषणाबाजीला सुरुवात केली. यामुळे दोन्हही गटाचे कार्यकर्ते आमने सामने आले आणि बाचाबाची सुरु झाली.
दोन्हही गटांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाल्यावर त्या ठिकाणी पोलीस दाखल झाले.पोलिसांनी दोन्हही गटाच्या कार्यकर्त्यांना दूर ठेवण्याचा प्रयत्न करत कायदा सुव्यवस्था टिकवण्याचे आवाहन केले. शिवसेनेच्या शाखेवरून यापूर्वी देखील ठाण्यात ठाकरे आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते आपापसात भिडले होते.