गतविजेत्या हॅलेपची दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार
लंडन – विम्बल्डन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेची कार्यक्रमपत्रिका शुक्रवारी जाहीर करण्यात आली. येत्या सोमवार पासून ही स्पर्धा सुरु होणार आहे. दरम्यान टेनिसमधील प्रतिष्ठेची मानली जाणारी विम्बल्डन स्पर्धा गेल्या वर्षी झाली नाही. कोरोनामुळे ही स्पर्धा अधिकृतपणे रद्द करण्यात आली होती.
1945 नंतर प्रथमच ही स्पर्धा रद्द करण्यात आली आहे. यापूर्वी दुसर्या महायुद्धावेळी ही स्पर्धा रद्द करण्यात आली होती.आता ही स्पर्धा 28 जून ते 11जुलै 2021या कालावधीत होईल.
हिरवळीचा बादशाह’ म्हणून ओळखला जाणारा स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर आणि जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी विराजमान असलेला सर्बियाचा नोव्हाक जोकोव्हिच या दोघांमध्ये विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीची अंतिम फेरी रंगू शकते.
दरम्यान, महिला विभागातील विद्यमान विजेती रुमानियाची सिमोना हॅलेपने दुखापतीमुळे या स्पर्धेतून माघार घेतल्याची घोषणा शुक्रवारी केली. विम्बल्डन ग्रँडस्लॅम स्पर्धेत आता सिमोना हॅलेप, जपानची ओसाका त्याचप्रमाणे स्पेनचा नदाल, ऑस्ट्रियाचा थिएम यांनी माघार घेतली आहे. दरम्यान जोकोव्हिच-फेडरर या दोघांमधील द्वंद्व चाहत्यांना थेट अंतिम फेरीतच पाहायला मिळू शकते.
गतविजेत्या जोकोव्हिचला अव्वल मानांकन मिळाले असून फेडररला आठवे मानांकन लाभले आहे. जोकोव्हिचच्या मार्गात उपांत्य फेरीत ग्रीसच्या स्टेफानोस त्सित्सिपासचा अडथळा येऊ शकतो, तर फेडररला अंतिम फेरी गाठण्यापूर्वी अलेक्झांडर झ्वेरेव्ह, डॅनिल मेदवेदेव या उगवत्या ताऱ्यांचा सामना करावा लागेल. स्पेनचा राफेल नदाल व ऑस्ट्रियाचा डॉमिनिक थीम यांनी स्पर्धेतून माघार घेतली.
महिलांमध्ये 24व्या ग्रँडस्लॅमच्या प्रतीक्षेत असलेल्या अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सला यंदा जेतेपद मिळवण्याची सुवर्णसंधी आहे. पोलंडची इगा श्वीऑनटेक आणि फ्रेंच विजेती बाबरेरा क्र जिकोव्हा मातब्बरांना पुन्हा धक्का देण्यासाठी सज्ज आहेत.